सीए इन्स्टिट्यूट रत्नागिरी शाखेतर्फेजीएसटी आणि ऑडिट स्टँडर्डवर चर्चासत्र
रत्नागिरी : सीए इन्स्टिट्यूटच्या रत्नागिरी शाखेतर्फे हॉटेल व्यंकटेश येथे जीएसटी आणि ऑडिट स्टँडर्ड या विषयांवर चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. विषयांचे महत्त्व लक्षात घेता चर्चासत्राला रत्नागिरी तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सीएचा उस्फुर्त प्रतिसाद मिळाला. या चर्चासत्राचे उद्घाटन सीए इन्स्टिट्यूट शाखाध्यक्ष सीए मुकुंद मराठे, सचिव सीए शैलेश हळबे, सीए चैतन्य वैद्य, सीए गुरुनाथ भिडे यांनी दीपप्रज्वलनाने केले.
रत्नागिरी शाखेचे अध्यक्ष सीए मुकुंद मराठे यांनी हे या वर्षातील शेवटचे ज्ञानसत्र असल्याचे सांगत वर्षभर झालेल्या कार्यक्रमांचा आढावा घेतला. या सत्रातील विषयांचे महत्त्व विशद केले. प्रत्येक सभासद, शाखा आपली आहे, या प्रामाणिक भावनेतून शाखेसाठी काम करत असतो. त्यामुळे रत्नागिरी शाखेचे नेतृत्व करणे हे सर्वांच्या सहकार्याने शक्य होते, असेही मुकुंद मराठे म्हणाले.
सत्राची सुरुवात सीए चैतन्य वैद्य यांनी जीएसटी फॉर्म ९ आणि ९ सी म्हणजेच वार्षिक रिटर्न भरताना येणाऱ्या अडचणी आणि घ्यायची काळजी तसेच यासंबंधी येणाऱ्या नोटीस व त्याला कसे उत्तर देता येईल या बाबतीत मार्गदर्शन केले. ३१ डिसेंबर ही आर्थिक वर्ष २२-२३ साठी जीएसटी वार्षिक रिटर्न भरायची शेवटची तारीख असल्याने हा महत्वाचा विषय या सत्रात घेण्यात आला.
सत्राच्या दुसऱ्या शाखेचे कोषाध्यक्ष भागात सीए अक्षय जोशी यांनी ऑडिट स्टँडर्डचा आढावा घेताना ऑडिट करताना सांभाळावी लागणारी कागदपत्रे विविध पुरावे यांच्याशी संबंधित तीन स्टँडर्ड विशेष उलगडून सांगितली. सर्व सीएना ऑडिट करताना ही स्टँडर्ड पाळावी लागतात ज्यामुळे ऑडिटच्या कामात सुधारणा होऊन गुणवत्ता पाळली जाते.
दोन सत्रांना अध्यक्ष म्हणून अनुक्रमे सीए गुरुनाथ भिडे व विकासा चेअरमन सीए केदार करंबेळकर यांनी काम पाहिले. व्याख्यात्यांचा सत्कार शाखेच्या उपाध्यक्ष सीए अभिलाषा मुळ्ये, सीए शैलेश हळबे यांच्या हस्ते करण्यात आला. या वेळी पाहुण्यांचा परिचय सीए कपिल लिमये यांनी करून दिला. सूत्रसंचालन सीए नयन सुर्वे यांनी केले. आभार सीए शैलेश काळे यांनी मानले.