
गुहागर तालुक्यात आजपासून कुष्ठरुग्ण, क्षयरुग्ण शोध मोहीम
गुहागर : केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार, गुहागर तालुक्यामध्ये 20 नोव्हेंबर ते 6 डिसेंबर या कालावधीत कुष्ठरुग्ण शोध मोहीम व सक्रिय क्षयरुग्ण शोध मोहीम राबविण्यात येणार आहे.
या मोहिमेसाठी तालुक्यातील 1 लाख 34 हजार 491 इतकी लोकसंख्या निवडली असून या लोकसंख्येमध्ये 34 हजार 918 इतक्या घरांमध्ये तपासणी केली जाणार आहे. एकूण 121 इतक्या टीम तयार केल्या गेल्या आहेत. या टीममध्ये सुमारे 242 कर्मचारी व 24 पर्यवेक्षक काम करणार आहेत. आरोग्य विभागातील आरोग्य कर्मचारी, आरोग्य सेवक-सेविका अशा कार्यकर्ती, स्वयंसेवक, प्रत्यक्ष जाऊन घरोघरी भेट देऊन संशयित क्षयरुग्णांची व कुष्ठरुग्णांची मोफत तपासणी करणार आहेत. निदान झाल्यास मोफत उपचार केला जाणार आहे.
जनजागृती करण्यासाठी विशेष मोहिम राबविण्याचे निश्चित केले असून समाजातील निदान न झालेले कुष्ठ व क्षय रुग्णांना लवकरात लवकर शोधून त्यांना त्वरीत औषधोपचाराखाली आणणे हा या मोहिमेचे उद्देश आहे. लक्षणे असल्यास आरोग्य कर्मचारी,आशा स्वयंसेविका व पुरुष स्वयंसेवक यांच्याकडून मोहिमेदरम्यान तपासणी करुन घ्यावी, असे अवाहन तालुका आरोग्य अधिकारी यांनी केले आहे.
त्वचेवर फिकट अथवा लालसर बधीर चट्टा त्या ठिकाणी घाम न येणे, तेलकट, चकाकणारी त्वचा त्वचेवर थंड व गरम संवेदना न जाणवणे, त्वचेवर गाठी असणे, कानाच्या पाळ्या जाड होणे, सतत हातापायात मुंग्या येणे
न बरी होणारी जखम असणे, क्वचित प्रसंगी हातातून वस्तू गळून पडणे किवा चालतांना पायातून चप्पल गळून पडणे. तसेच
क्षयरोगाची प्रमुख लक्षणे
म्हणजे दोन आठवडे व त्यापेक्षा जास्त काळाचा खोकला, संध्याकाळी येणारा ताप, भूक न लागणे, वजन घटणे, थुंकीतून रक्त पडणे, धाप लागणे आदी लक्षणे फुप्फुसाच्या क्षयरोगामध्ये आढळतात.
फुप्फुसाव्यतिरिक्त क्षयरोगामध्ये मानेवर गाठी, लसिकाग्रंथीना सूज येणे, पोटात दुखणे, अपचन, शौचाला त्रास होणे, सांध्यांना सूज येणे, मणक्यांमध्ये दुखणे, वंध्यत्व आदी लक्षणे आढळतात.