
पेवे येथे दोन महिला ग्रामपंचायत सदस्यांना जीवे मारण्याची धमकी; तिघांविरुद्ध गुन्हा दाखल
गुहागर:ग्रामपंचायतीत यापुढे दिसलात तर तुम्हाला धक्के मारून बाहेर काढू. आम्ही दाऊदची माणसे आहोत, असे म्हणत अश्लील शिवीगाळ करून दोन महिला ग्रामपंचायत सदस्यांना जीवे मारण्याची धमकी दिल्याची घटना तालुक्यातील पेवे येथे समोर आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी गावातील शौकत महमद खान, मुनाफ युसूफ खान व नीलेश मुरलीधर कीर यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
या बाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, १९ ऑक्टोबरला सायंकाळी ४ च्या दरम्यान पेवे ग्रामपंचायतीची सभा घेण्यात आली. सभेनंतर ग्रामपंचायतीच्या बाहेर शौकत महमद खान, मुनाफ युसूफ खान व नीलेश मुरलीधर कीर यांनी ग्रामपंचायत सदस्या सौ. सरगुरो व सौ. हरचिलकर यांना पाहून शौकत महमद खान याने आज तुमची शेवटची सभा आहे, असे समजा. यापुढे तुम्ही ग्रामपंचायतीत दिसलात तर तुम्हाला धक्के मारून बाहेर काढीन. मी दाऊदचा माणूस आहे. तुम्हाला मारायला वेळ लागणार नाही. माझे डोके गरम आहे. मी मागेपुढे पाहत नाही. महिला असो की, पुरुष असे बोलून या दोघींना अश्लील भाषेत शिवीगाळ केली. तसेच तुमच्या नवऱ्यांना बोलवा, त्यांनाही जीवे मारू, अशी धमकी दिली. मुनाफ युसूफ खान व नीलेश मुरलीधर किर यांनीही शौकत खानच्या म्हणण्याला दुजोरा देऊन सौ. सरगुरो व सौ. हरचिलकर यांना अश्लील भाषेत शिविगाळ करून धमकी दिली.
या प्रकरणी ग्रामपंचायत सदस्या सौ. सरगुरो व सौ. हरचिलकर यांनी २४ ऑक्टोबरला पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. यानुसार तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.