
ताणतणावावर मात करण्यासाठी साहित्याचा उपयोग : नमिता कीर
मालगुंड येथे कवी केशवसुतांची जयंती साजरी
रत्नागिरी: आयुष्यात प्रत्येक जणं जगत असताना, रोजच्या घाईगडबडीत येणाऱ्या ताणतणावावर मात करण्यासाठी साहित्य खुप मोलाचे सहकार्य करत असते. त्यामुळेच साहित्यात रमणारे माणसे आयुष्यात यशस्वी होत असतात, असे मत कोकण मराठी साहित्य परिषदेच्या केंद्रीय अध्यक्षा नमिता कीर यांनी व्यक्त केले.
कोकण मराठी साहित्य परिषद आणि कवी केशवसुत स्मारक मालगुंड यांच्यावतीने आयोजित कवी केशवसुत यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कविता माझी कवी केशवसुतांची या कार्यक्रमात त्या बोलत होत्या. त्या म्हणाल्या, कोकण मराठी साहित्य परिषदेच्या माध्यमातून साहित्य चळवळ कायम प्रवाही राहील यासाठी विविध उपक्रमाचे आयोजन केले जाते. त्याचाच एक भाग म्हणून आज हा कार्यक्रम याठिकाणी आयोजित केल्या आहेत. कवी केशवसुत, त्यांचे साहित्य आणि कवी केशवसुत स्मारक हे चैतन्य निर्माण करणारे आहे. हे चैतन्य कायमस्वरूपी कोकण मराठी साहित्य परिषदेच्या माध्यमातून होताना दिसत आहे.
रवींद्र मेहेंदळे यांनी रामानंद लिमये यांच्या सहकार्याने कवी केशवसुत यांची आरती सादर केली. त्यानंतर शुभदा मुळ्ये, रामानंद लिमये, हनुमंत कदम यांनी स्वागत केले. समग्र केशवसुत यावर प्रा. आनंद शेलार, कविवर्य केशवसुत यांच्या कवितांचे रसग्रहण उज्जवला बापट यांनी तर मूर्तीभंजन या ग्रंथाचे अभिवाचन अमेय धोपटकर व स्मिता बापट यांनी केले. तसेच समीर देशपांडे, रवींद्र नाडगौडा, डॉ. माया तिरमारे, रिया लिंगायत, मधुरा तिरमारे, विलास राणे, शुभदा मुळ्ये, सुरेखा कुळकर्णी, अरुण मोर्ये, अमेय धोपटकर, अरुण मोर्ये, राजेश गोसावी, संजय कुलये, ज्ञानेश्वर पाटील, ऍड. सुरज बने, उमेश मोहिते यांनी कविता सादर केल्या. विनोद मिरगुले, युयुत्सु आर्ते, नलिनी खेर, तेजा मुळ्ये, दीपराज माने यांनी विचार प्रकटीकरण करत कवी केशवसुतांना अभिवादन केले. तालुक्यातील फणसवळे गावचे दीपराज माने यांनी लिहिलेल्या मी आहे ना या कादंबरीचे प्रकाशन करण्यात आले.
जागर केशवसुतांचा कार्यक्रम शाळांमध्ये
प्रास्ताविकात गजानन पाटील यांनी कार्यक्रमाचे स्वरूप सांगताना कोमसाप पुढील वर्षीही असेच कार्यक्रम आयोजित करणार आहे. आजच्या पिढीला कवी केशवसुत यांचे कार्य, साहित्य आणि सामाजिक जाणिव समजून यावी यासाठी कवी केशवसुत पुण्यतिथी म्हणजेच सात नोव्हेंबरपर्यंत रत्नागिरी जिल्ह्यातील शाळा, महाविद्यालयात जागर केशवसुतांचा हा कार्यक्रम राबविण्यात येणार आहे.