
चिपळूणमध्ये एनडीआरएफ पथक; पूर परिस्थितीवर प्रशासनाचे पूर्ण लक्ष: जिल्हाधिकारी
रत्नागिरी: खेड आणि चिपळूणमधील पूर परिस्थितीवर प्रशासनाचे पूर्ण लक्ष असून आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्यात येत असल्याची माहिती जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांनी दिली.
जिल्हाधिकारी श्री. सिंह आणि पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी आज खेड आणि चिपळूणमधील पूर परिस्थितीची संयुक्त पाहणी करत आढावा घेतला. ते म्हणाले, सरासरी पेक्षा जास्त पाऊस पडत असल्याने खेड-चिपळूण मधील काही नद्यांनी धोका पातळी तर काहींनी इशारा पातळी ओलांडली आहे. चिपळूणमध्ये एनडीआरएफची पथके 6 ठिकाणी कार्यरत असून परिस्थितीवर प्रशासनाचे पूर्ण लक्ष आहे. चिपळूण व खेड तालुक्यामधील शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील परशुराम घाटामध्ये अतिवृष्टीमुळे दरड कोसळलेल्या ठिकाणाची पाहणीही जिल्हाधिकारी श्री. सिंह यांनी आज केली. परशुराम घाटात चिपळूणकडून मुंबईकडे एकेरी वाहतूक सुरु केलेली आहे. खेडकडून चिपळूणकडे येणारी लहान वाहने पाली कळंबस्ते मार्गे चिपळूणकडे सोडण्यात येत आहेत. चिपळूणमधील मिरजोळी जुवाड येथील 19 कुटुंबातील 65 जणांना स्थलांतरित करण्यात आलेले आहे. ते सर्वजण नातेवाईकांच्या घरी आहेत. खेड तालुक्यात 45 कुटुंबातील 166 जणांचे सुरक्षित स्थळी स्थलांतरण करण्यात आले आहे. यात खेड (खामतळे झोपडपट्टी मधील 24 कुटुंबातील 90 जणांना तटकरी हॉल येथे , भोस्ते पुलाजवळील झोपडपट्टीतील 6 कुटुंबातील 30 जणांना डॉ. अलवी यांच्या इमारतीमधील शेडमध्ये, बोरघर (कातकरवाडी) येथील 4 कुटुंबातील 22 जणांना शेजारील वाडीतील घरांमध्ये, खारी (बहुतुलेवाडी) येथील 4 कुटुंबापैकी 14 जणांना शेजारील घरांमध्ये, नांदगाव (माळीवाडी) येथील एका कुटुंबातील दोघाजणांना शेजारील घरांमध्ये आणि चाटवमधील 3 कुटुंबातील 8 जणांना शेजारील घरांमध्ये स्थलांतरीत केले आहे. पूरपरिस्थितीमुळे खेड-दापोली, तळवट खेड- तळवट जावळी, भोस्ते-अलसुरे, खेड-शिर्शी (देवणापूळ), चिंचघर ते बहिरवली, आंबवली बाऊलवाडी (दरड पडल्याने) आणि शिव मोहल्ला ते शिव खुर्द (बौध्दवाडी क्र.१) रस्ते बंद झाले आहेत. शिवाय शिरगाव (बागवाडी), शिरगांव (पिंपळवाडी) शिरगाव (कोंडवाडी), शिरगाव (धनगरवाडी) यांचा संपर्क तुटलेला आहे. मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील बहादूरशेख पुलाजवळून एक गाय व एक म्हैस वाशिष्ठी नदीत वाहून गेली आहे.