रत्नागिरी कोल्हापूर मार्गावरील वाहतूक ठप्प
रत्नागिरी : मुंबई-गोवा महामार्गापाठोपाठ आता रत्नागिरी – कोल्हापूर महामार्गावर नाणीज येथे रस्ता खचला आहे. सलग दोन दिवस सुरु असलेल्या पावसामुळे गुरुवारी मध्यरात्री मातीचा भरावात ट्रकही अडकल्याने वाहतूक बराच काळ विस्कळीत झाली होती.
बुधवारी मध्यरात्री मुंबई-गोवा महामार्गावर निवळी ते हातखंबा दरम्यान रस्ता खचला. गुरुवारी रात्री असाच प्रकार रत्नागिरी – कोल्हापूर महामार्गावर नाणीज येथे घडला. या महामार्गाचेही रुंदीकरणाचे काम सुरू आहे. अनेक ठिकाणी मातीचा भराव टाकण्यात आला आहे. दोन तीन दिवस पडणाऱ्या मुसळधार पावसाने नाणीज येथे हा भराव खचला. त्यामुळे रात्री साडेबारा वाजल्यापासून रत्नागिरी कोल्हापूर मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. खचलेल्या रस्त्याच्या ठिकाणी ठेकेदाराकडून तात्पुरती उपाययोजना करण्यात आली आहे. मात्र अजूनही वाहतुकीवर मोठा परिणाम दिसून येत आहे. सध्या या मार्गावर अवजड वाहनांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या दिसत आहेत. फक्त छोट्या गाड्यांची ये- जा सुरु आहे.