त्या बार्जमुळे पावसाळ्यात पालशेत बाजारपेठ पाण्याखाली जाण्याची भीती
गुहागर : गुहागर तालुक्यातील पालशेत समुद्रकिनारी गेल्या वर्षभरापूर्वी वाहून आलेले विदेशी बार्ज अजूनही तसेच आहे. परंतु पालशेत खाडीच्या मुखाजवळ अडकलेल्या या बार्जमुळे पावसाळ्यात समुद्राच्या भरतीबरोबर अतिवृष्टीतून पालशेत बाजारपेठ पाण्याखाली जाण्याची भीती निर्माण झाली आहे. यामुळे चौपाटीवरील बार्ज सध्या पालशेतवासियांसाठी आपत्ती ठरले आहे.
पालशेत बाजारपेठ खाडीच्या किनारी वसली आहे. तर बहुतांशी घरे ही समुद्रचौपाटीलगत बागायतींमध्ये वसली आहेत. जुलै महिन्यात येणार्या मोठ्या भरतीवेळी तसेच अवेळी मुसळधार पावसामध्ये समुद्राला आलेले उधाण व त्यामध्येच पालशेतमधील नदी खाडीमध्ये सर्व बाजूनी येणारे पाणी याची पातळी वाढल्यावर तेथील पुलावरून पाणी जाते.
गतवर्षी दोन वेळा पुलावरून पाणी गेले होते. केवळ पुलावरून पाणी जाते असे नाही तर नदीशेजारी वसलेल्या कुटुंबांच्या घरामध्ये पाणी शिरते. परिणामी संपूर्ण बाजारपेठ जलमय होते. दरम्यान याच नदीच्या मुखाजवळ गतवर्षीपासून मोठे बार्ज येवून पडले आहे. हे विदेशी बार्ज समुद्रामध्ये झालेल्या अपघातामुळे पालशेत समुद्रकिनारी आले असून या महाकाय बार्जमुळे पालशेत येथील नदीचे भरती ओहोटीचे मुख बंद झाले आहे.