
खेडमध्ये गांजासह 68 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त; गुन्हा दाखल
खेड:- मुंबई-गोवा महामार्गावर शिवफाटा येथे 42 हजार 750 रुपयांच्या गांजासह रोख रक्कम व इतर साहित्य असा 68 हजार 720 रुपयांचा ऐवज येथील पोलिसांनी जप्त केला. याप्रकरणी अनिल शिवराम चव्हाण उर्फ अनिल बुवा (50 रा. दाभिळ- कुभारवाडी) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सोमवारी रात्री 8.40 वाजण्याच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली.
अनिल शिवराम चव्हाण उर्फ अनिल बुवा हा शिवफाटा येथील टोलनाका येथे गांजाचा साठा घेऊन ग्राहकांना विक्री करण्यासाठी येणार असल्याची गोपनीय माहिती येथील पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलीस उपविभागीय अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सुजित गडदे व पथकाने सापळा रचला. यादरम्यान, शिवफाटा येथील टोल नाका येथे एक व्यक्ती काळ्या रंगाची सॅक घेऊन उभा होता. त्याच्या हालचाली संशयास्पद वाटल्याने पोलीस पथकाने त्याची झडती घेतली. या झडतीत एका प्लास्टीकच्या पिशवीत अनिल शिवराम चव्हाण याच्याकडे 42 हजार 750 रुपये किंमतीचा गांजा, 13 हजार 320 रुपये रोकड अन्य साहित्य असा 68 हजार 720 रुपयांचा ऐवज जप्त केला.
याबाबत पोलीस शिपाई रुपेश जोगी यांनी पोलीस स्थानकात तक्रार दाखल केला. पथकात पोलीस शिपाई अजय कडू यांचाही समावेश होता. या कारवाईने बेकायदेशीरपणे गांजाची विक्री करणाऱ्या व्यावसायिकांचे धाबे दणाणले आहेत.