
किरकोळ कारणातून चाैघांची डंपर चालकाला बेदम मारहाण
मंडणगड:- गाडीला कट मारल्याच्या रागातून दापाेली येथील चाैघांनी डंपर चालकाला बेदम चोप दिल्याची घटना रविवारी (२८ मे) सकाळी १०:३० वाजेच्या दरम्यान दहागाव (ता. मंडणगड) येथे घडली. यामध्ये डंपर चालक जखमी झाला असून, मंडणगड पाेलिस स्थानकात चाैघांविराेधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
डंपर चालक विनोद खानविलकर (रा. केळवत, ता. मंडणगड) यांनी फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार भगवान घाडगे, प्रदीप सुर्वे, सुधीर कालेकर व सचिन जाधव यांच्या विराेधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विनाेद खानविलकर हे डंपर (एमएच ०८, बीबी ७४४४) घेऊन कुंबळे ते चिंचाळी असे जात हाेते. कुंबळे ते दुधेरे गावादरम्यान समोरून दापोलीच्या दिशेने लाल रंगाची गाडी येत होती. या गाडीचे चाक रस्त्याच्या कडेला गेल्याने खानविलकर यांनी डंपर सरळ करून चिंचाळीकडे निघाले.
त्यानंतर दहागाव येथील गतिराेधकाजवळ डंपरसमोर कार आडवी लावली व यातील भगवान घाडगे यांनी चालक खानविलकर यांना माझ्या गाडीला हूल का दिलीस, असे म्हणून गाडीतून खाली खेचून डंपरमधील लोखंडी राॅडने मारहाण केली, तसेच त्यांच्यासोबत असणारे सुधीर कालेकर, प्रदीप सुर्वे व सचिन जाधव यांनीही मारहाण केली. यावेळी खानविलकर यांच्या डोक्यामध्ये दगड मारण्यात आल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. या मारहाणीत डंपरची काच फोडून डंपरचे नुकसान करण्यात आले आहे.