
रंगकर्मीनी नाट्यगृहाच्या समस्यांचा वाचला पाढा
रत्नागिरी, : ज्येष्ठ रंगकर्मी आणि नाट्यरसिकांची येथील स्वा. वि. दा. सावरकर नाट्यगृहाच्या पायऱ्यांवर नाट्यगृहाच्या समस्येबाबत बैठक झाली. जमलेल्या रंगकर्मींनी वीसपेक्षा जास्त समस्यांचा उल्लेख केला, तर याबाबत पालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांना निवेदन देण्याचे निश्चित करण्यात आले. या नाट्यगृहाच्या विविध समस्यांकडे पालिकेने तातडीने लक्ष द्यावे, अशी मागणी रंगकर्मींकडून होत आहे.
स्वा. सावरकर नाट्यगृहात प्रयोगादरम्यान आजतागायत आलेल्या दिग्गज कलाकारांनी या दुरवस्थेबद्दल वारंवार भाष्य करूनही पालिका प्रशासन आजही ढिम्म असल्याचाच अनुभव येत असल्याचे सांगण्यात आले. ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले, अशोक सराफ व नुकतेच नाट्यगृहात येऊन गेलेले भरत जाधव यांनी तर नाट्यगृहाच्या दुरवस्थेसंदर्भात पालिका प्रशासनासमोर हात जोडले; पण पालिका प्रशासन आमचे नाट्यगृह छानच असल्याचा दावा करत आहे. यासाठी शनिवारी (ता. २७) रत्नागिरीतील रंगकर्मींनी नाट्यगृहाच्या पायऱ्यांवर या संदर्भात बैठक आयोजित केली होती. या बैठकीला शहरातील सर्व ज्येष्ठ नाट्यकर्मी तसेच रसिक व रंगकर्मी उपस्थित होते.
रंगकर्मीकडून पालिका प्रशासनाने येथील रंगकर्मींना भेटण्यासाठी वेळ द्यावी, नामफलक योग्य जागी लावणे, नाट्यगृहासमोरील रस्त्यावर होणाऱ्या वाहनांची कोंडी टाळण्यासाठी प्रयत्न करणे, नाट्यगृहातील प्रसाधनगृहाची वेळचे वेळी साफसफाई करून घेणे तसेच या ठिकाणच्या प्रसाधनगृहाचा वापर बाहेरील व्यक्तीकडून होऊ नये, यासाठी योग्य ती खबरदारी घेण्यात यावी. प्रेक्षागृहातील मोडलेल्या खुर्च्या दुरुस्त करून त्यांचा योग्य क्रम लावणे, वातानुकूलित यंत्रणा डिझेलवर न ठेवता विजेवरील करावी, रंगमंचावरील मुख्य पडदा, विगेंचे कापड तसेच मेकअपरूममधील पडदे बदलावेत व त्यांची वेळोवेळी स्वच्छता करावी, सर्व सोयीसुविधा पूर्ण झाल्यानतंर प्रत्येक विभागातील तज्ज्ञ व्यक्तींच्या देखभाल दुरुस्तीसाठी नेमण्यात यावी आदी समस्यांबाबत रंगकर्मींची चर्चा झाली; मात्र या चर्चेनंतर पालिका मुख्याधिकाऱ्यांची भेट घेऊन निवेदन देण्यात येणार असल्याचे रंगकर्मींकडून सांगण्यात आले. या वेळी शहर व ग्रामीण भागातील ६५ रंगकर्मी बैठकीस उपस्थित होते.