माणसाने माणसाशी माणसाप्रमाणे वागणे म्हणजेच धम्म
आबलोली येथे भन्तेजी महेंद्रा बोधी यांचे प्रतिपादन
गुहागर:- विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या सर्वांच्या जीवनाचे कल्याण व्हावे ,मंगल व्हावे यासाठी आणि तथागत गौतम बुध्दांचा पवित्र विज्ञानवादी बुध्द धम्म नीट समजावा म्हणून आपल्याला २२ प्रतिज्ञा दिलेल्या आहेत त्या प्रतिज्ञा आपण जर अंगिकारल्या , पाळल्या तर आपल्या जिवनाचे सोनं होईल मंगल होईल आपल्या जिवनात क्रांती घडून येईल म्हणूनच आपण धम्म समजून घेतला पाहिजे धम्म आणि धर्म यातील फरक समजून घेतला पाहिजे धम्म हा माणसाच्या आचरणावर अवलंबून असून माणसाने माणसाशी माणसासारखे वागणे म्हणजेच धम्म होय, असे स्पष्ट प्रतिपादन आदरणीय भन्तेजी महेंद्रा बोधी यांनी गुहागर तालुक्यातील आबलोली येथील आनंदवन बुध्द विहार मौजे आबलोली येथे धम्म देसना आणि धम्म प्रवर्चन कार्यक्रमात मार्गदर्शन करताना केले.
आनंदवन बुध्द विहार मौजे आबलोली या बुध्द विहाराचा २५ वा उदघाटन वर्धापन दिन रौप्य महोत्सव भारताच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वर्षी ,धम्म दिक्षा भूमी आबलोली येथील आनंदवन बुध्द विहार डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक सभागृह येथे बुध्द विहाराच्या विश्वस्त मंडळाचे वतीने दिनांक १७,१८,१९ मे २०२३ रोजी तथागत भगवान गौतम बुध्द यांची २५६७ वी जयंती आणि विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची १३२ वी जयंती असा संयुक्त जयंती महोत्सव आणि बुद्ध विहाराचा उदघाटन रौप्य महोत्सव श्री. सुरेश सोन्या पवार यांचे अध्यक्षतेखाली उत्साहात ,जल्लोषात आणि मंगलमय वातावरणात संपन्न झाला.यावेळी आदरणीय भन्तेजी डॉ.एन.आनंद महाथेरो (सिलोन) यांचे शिष्य आदरणीय भन्तेजी महेंद्रा बोधी (बदलापूर) यांचे दिनांक १७ मे २०२३ रोजी आबलोलीत आगमन झाले त्यांना आबलोली बाजारपेठेतील एस.टी.स्टॉप येथे समता सैनिक दलाने मानवंदना दिल्यानंतर मिरवणूकीने, रॕलीने महामानवांच्या घोषणा देत बुध्द विहारात आणण्यात आले त्यानंतर बुध्द पुजा पाठाचा , बुध्द वंदनेचा कार्यक्रमही उत्साहात संपन्न झाला.
यावेळी धम्मदेसना दिल्यानंतर आदरणीय भन्तेजी महेंद्रा बोधी (बदलापूर) हे १) बुध्द आणि त्यांचा धम्म २) सद्यस्थिती या विषयावर प्रवचनातून मौलिक मार्गदर्शन करीत होते.आदरणीय भन्तेजी महेंद्रा बोधी पुढे म्हणाले की,आपण माणसा सारखे वागायचे असेल , आदर्श माणूस म्हणून जगायचे असेल तर आपल्याला संस्कारांची गरज आहे आणि तेच संस्कार तथागतांनी आपल्याला धम्मा मध्ये दिलेले आहेत तथागतांचा धम्म मार्ग हा विज्ञानावर आधारीत असून तुमच्या मनाच्या मांगल्यावर विज्ञानाच्या कसोटीवर शब्दान शब्द घासून बघा जर पटला तरच तो धम्म स्विकारा बुध्द धम्म हा आपल्याला प्रगतीकडे ,दु:ख मुक्तीकडे घेऊन जातो बुध्द धम्मात अंधश्रध्दा व कर्मकांडाला थारा नाही ४५ वर्षे तथागतांनी आपले संपूर्ण आयुष्य पायी प्रवास करुन दु:ख मुक्ती केली . अंधश्रद्धा व कुठलेच कर्मकांड बुध्द धम्मात केले जात नाही आत्मा ,परमात्मा मृत्यु नंतरचे अस्तित्व ,कर्मकांडाचे स्तोत्र ,ज्योतिषशास्त्र या सर्व गोष्टींना तथागतांनी नाकारले आहे.
असे सांगून भन्तेजी महेंद्रा बोधी पुढे म्हणाले की, जो पर्यंत तुमच्या मनातले देव जात नाही तो पर्यंत तुमच्या देव्हा-यातील देव जाणार नाहीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मुळेच आपल्याला बुध्द समजला आहे त्या बुध्दाच्या विज्ञानवादी धम्म मार्गाने आपण वाटचाल करुया असे मौलिक मार्गदर्शन भन्तेजी महेंद्रा बोधी यांनी केले.
यावेळी विचारपिठावर अध्यक्षस्थानी आनंदवन बुध्द विहार मुंबई संघटनेचे अध्यक्ष सुरेश सोन्या पवार, स्वागताध्यक्ष म्हणून गाव संघटनेचे अध्यक्ष दत्ताराम कदम , जेष्ठ मार्गदर्शक बबनराव कदम, एम . बी. पवार , मुंबई संघटनेचे सेक्रेटरी अनिल कदम , गाव संघटनेचे सेक्रेटरी अविनाश कदम, सुरेश रामा पवार , सिताराम कदम , संजय टोलू कदम , संदिप कदम ,मिलींद कदम , सिलवर्धन कदम , सुभाष कदम , मंगेश कदम, सिध्दार्थ पवार, प्रमोद पवार, सुरेश शिवराम कदम , कुमार कदम , आदी. मान्यवर उपस्थित होते. या संपूर्ण कार्यक्रमाचे सुत्रसंचालन अनिल कदम ,अविनाश कदम यांनी केले. या संपूर्ण कार्यक्रमाला गुहागर तालुक्यातील जनता बहुसंख्येने उपस्थित होती.