
गणेशोत्सवादरम्यान कोकण रेल्वे मार्गावर 350 रेल्वे चालवा
विनायक राऊत यांची मागणी
रत्नागिरी:- गणेशोत्सवानिमित्त कोकणात गावी येणाऱ्या चाकरमानी, गणेशभक्तांच्या कोकण रेल्वे तिकीट बुकिंग बाबतच्या तक्रारींची शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) खासदार विनायक राऊत यांनी गंभीर दखल घेत गुरूवारी कोकण रेल्वेचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक संजय गुप्ता यांची भेट घेत चर्चा केली. कोकण रेल्वे मार्गावर यावर्षी किमान 350 ट्रेन्स गणेशोत्सवाच्या दरम्यान चालविण्याची मागणी खासदार विनायक राऊत यांनी यावेळी प्रामुख्याने केली. तसेच जादा सोडणाऱ्या गाड्या या किमान दोन महिने आगाऊ जाहीर कराव्यात व तिकीट आरक्षणामध्ये कोणतेही गैरव्यवहार होणार नाहीत याची खबरदारी घ्यावी, अशी मागणी यावेळी शिष्टमंडळाने केली असल्याची माहिती खासदार विनायक राऊत यांनी दिली.
श्री गणेश चतुर्थी 2023 च्या निमित्ताने कोकणात येणाऱ्या गणेश भक्तांना कोकण रेल्वेचे तिकीट आरक्षित करताना जो त्रास झाला, त्या अनुषंगाने विचारणा करणे, दलालांना पायबंद करणे आणि अधिकाधिक रेल्वे गणेशोत्सवाच्या दरम्यान सोडणे या विविध विषयाच्या अनुषंगाने विनायक राऊत, सिंधुदुर्ग जिल्हा संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर व रत्नागिरी जिल्हा शिवसेना संपर्कप्रमुख सुधीरभाऊ मोरे आणि कोकणवासीय शिष्टमंडळ यांनी गुरुवारी कोकण रेल्वेचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक संजय गुप्ता यांची भेट घेतली.
या भेटीमध्ये सर्वच मुद्द्यांवर सकारात्मक चर्चा झाली. गणेशोत्सवानिमित्त यावर्षी कोकण रेल्वे मार्गावर किमान 350 विशेष गाड्या चालविण्यात याव्यात. ज्या ज्यादा रेल्वे गाड्या सोडण्यात येणार आहेत, या गाड्या किमान दोन महिने आगाऊ जाहीर कराव्यात व तिकीट आरक्षणामध्ये कोणतेही गैरव्यवहार होणार नाहीत याची खबरदारी घ्यावी, चाकरमानी गणेश भक्तांची कोणत्याही प्रकारची गैरसोय होणार नाही, याची रेल्वे प्रशासनाने दक्षता घ्यावी, अशी सूचना यावेळी खासदार विनायक राऊत यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने कोकण रेल्वे प्रशासनाकडे केली.कोकणात गमेश चतुर्थी सण मोठ्या धुमधडाक्यात साजरा केला जातो. या सणासाठी दरवर्षी कोकणात विशेषत: सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यात दाखल मोठ्या प्रमाणात चाकरमानी व गणेशभक्त दाखल होतात. गणेशोत्सवानिमित्त गावी येणाऱ्या चाकरमानी गणेशभक्तांच्या सेवेसाठी कोकण रेल्वे प्रशासनाकडून दरवर्षी गणपती स्पेशल ज्यादा रेल्वे गाड्याही कोकण रेल्वे मार्गावर सोडण्यात येतात. गणेशोत्सव काळात कोकणात येणाऱ्या प्रवाशांसाठी रेल्वेचे तिकीट बुकिंग गेल्या काहि दिवसांपासून सुरू करण्यात आले. मात्र अवघ्या काही मिनिटांत त्या त्या दिवशीचे तिकीट बुकिंग फुल्ल झाले. काही क्षणातच बुकिंग फुल्ल झाल्याने बहुतांशी प्रवाशांना तिकिट बुकिंग करताच आले नाही. त्यामुळे अनेक प्रवाशांच्या तक्रारी आल्या.
रेल्वे प्रवाशांच्या या तक्रारींची गंभीर दखल खासदार विनायक राऊत यांनी घेतली. ज्या प्रवाशांच्या तिकिट बुकिंग तसेच कोकण रेल्वे संदर्भात तक्रारी असतील तर त्या खासदार राऊत यांनी आपल्या ईमेलवर मागविल्या. रेल्वे प्रवाशांच्या या तक्रारी घेऊन खासदार विनायक राऊत यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने कोकण रेल्वेचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक संजय गुप्ता यांची भेट घेण्यात आली. तसेच रेल्वे प्रवाशांच्या तक्रारी दूर होण्याच्या दृष्टीने सकारात्मक चर्चा करण्यात आली.