कोकण रेल्वेच्या तिकीट बुकिंगमधील गैरव्यवहाराविरोधात सर्वपक्षांची एकजुट
रत्नागिरी:- कोकणातील सर्वात मोठा आणि आवडता सण म्हणजे गणेशोत्सव. याच गणेशोत्सवाला मुंबईतून मोठ्या संख्येने चाकरमानी कोकणात येतात. यंदा १९ सप्टेंबरला गणेशचतुर्थीला सुरूवात होणार आहे. त्यापूर्वी दोन दिवसांचे म्हणजेच १७ सप्टेंबरची कोकण रेल्वेच्या गाड्यांची तिकीटं एका मिनिटांत बुक झाली. अवघ्या मिनिटांमध्ये हे आरक्षण फुल्ल झाल्यामुळे चाकरमान्यांमध्ये संतपाचे वातावरण निर्माण झाले आहे. मात्र आता कोकण रेल्वेच्या प्रवाशांना दिलासा देण्यासाठी आणि तिकीट बुकिंगमधील गैरव्यवहाराविरोधात सर्वपक्षांची एकजुट झाल्याचे यला मिळत आहे.
तिकीट बुकिंगमधील गैरव्यवहाराविरोधात राज्याचे विरोधी पक्षनेते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांना पत्र लिहिलं आहे. तसेच, शिवसेनेचे (ठाकरे गट) खासदार विनायक राऊत कोकण रेल्वेचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक संजय गुप्ता यांची भेट घेणार आहेत. तसेच, भाजपा आमदार नितेश राणेही कोकणातील प्रवाशांसाठी पुढे सरसावले आहेत. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी येत्या सोमवारी देशाच्या रेल्वेमंत्र्यासोबत दिल्लीला एका बैठकीचं आयोजन केल्याचे नितेश राणे यांनी सांगितले. शिवाय, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे आमदार राजू पाटील यांनी केंद्रीय रेल्वे मंत्र्यांनी यासंदर्भात पत्र लिहिले आहे.