छत्रपती पुरस्कार मिळवणारे खेळाडू, त्यांना घडवणारे मार्गदर्शक रत्नागिरी जिल्ह्यात असल्याचा अभिमान – ना. सामंत
रत्नागिरी :छत्रपती पुरस्कार मिळवणारे खेळाडू आणि त्यांना घडवणारे मार्गदर्शक रत्नागिरी जिल्ह्यात आहेत, याचा मला सार्थ अभिमान आहे. शिक्षकांनी राष्ट्रीय मार्गदर्शक पंकज चवंडे यांचा तर विद्यार्थ्यांनी अपेक्षा सुतार आणि आरती कांबळेचा आदर्श घ्यावा असे प्रतिपादन पालकमंत्री उदय सामंत यांनी केले.
जिल्हा परिषदेच्या शामराव पेजे सभागृहात आयोजित सत्कार कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमाच्या सुरवातीलाच महाराष्ट्र राज्य खो-खो संघटनेेचे माजी सचिव संदिप तावडे, राष्ट्रीय मार्गदर्शक पंकज चवंडे, शिवछत्रपती पुरस्काराच्या यादीत असलेल्या अपेक्षा सुतार, आरती कांबळे, ठाण्याची खो-खोपटू प्रियांका भोपी या खेळाडूंचा पालकमंत्री सामंत यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. त्यानंतर मंत्री सामंत म्हणाले, नासा, इस्त्रोला जाणार्या विद्यार्थ्यांच्या सत्कारापुर्वी क्रीडाक्षेत्रातील पाच जणांचे सत्कार जाणीवपूर्वक केले आहेत. महाराष्ट्र राज्य खो-खो संघटनेचे माजी सचिव संदीप तावडे हे मैदानावर मार्गदर्शकाच्या भूमिकेत गेली अनेक वर्षे काम करत आहेत. प्रत्यक्ष मैदानावर राष्ट्रीय प्रशिक्षक पंकज चवंडे मुलांना घडवत आहेत. त्यांच्या प्रयत्नांमुळेच आज शिवछत्रपती पुरस्काराच्या यादीत अपेक्षा सुतार, आरती कांबळे या खेळाडू आहेत. जिल्ह्यासाठी हा खर्या अर्थाने भाग्याचा क्षण आहे. त्यांचा आदर्श भविष्यात सर्वांनी घेतला पाहिजे. हा पुरस्कार का मिळतो हे शाळांमधील प्रत्येक शिक्षकांने विद्यार्थ्यांना सांगायची आज गरज आहे. दोन मुलींबरोबरच प्रशिक्षक पंकज चंवडे यांनाही पुरस्कार जाहीर झाला पाहीजे होता. पण त्या खोलात न जाता, या खेळाडूंना घडवण्यासाठीचा हा सन्मान पुरस्काराप्रमाणेच आहे. पुरस्कार मिळाला नाही म्हणून पंकज चवंडे यांना मी पुढील वर्षी पाहू या असे म्हटले. पण पंकज म्हणाला माझी अपेक्षा पूर्ण झाली. हे उत्तर निश्चितच महत्त्वाचे आहे. सर्व शिक्षकांनी पंकजचा आदर्श तर विद्यार्थ्यांनी अपेक्षा, आरतीचा आदर्श डोळ्यासमोर ठेवावा. आदर्शवत खेळाडू घडवणारे मार्गदर्शक आणि खेळाडू ज्या जिल्ह्यात आहेत, अशा जिल्ह्याचा पालकमंत्री असल्याचा मला अभिमान आहे.