
महिला परिचरांचा आझाद मैदानात आक्रोश मोर्चा
रत्नागिरीतील दिडशे महिलांचा सहभाग ः मागण्या मान्य होईपर्यंत प्रयत्न करणार
रत्नागिरी – जिल्हा परिषद प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्रातील 1966 पासून सेवेत कार्यरत महिला परिचरांनी विविध मागण्यांसाठी सरकार विरोधात 1 मार्च पासून आक्रोश मोर्चा काढत मुंबई येथील आझाद मैदानात धरणे आंदोलन सुरू केले. जोपर्यंत मागण्या मान्य होत नाही, तोपर्यंत मैदान सोडणार नाही, असा पवित्रा परिचर महिलांनी घेतला आहे. जिल्हाभरातून दीडशे महिला या आंदोलनात सहभागी झाल्या आहेत.
मानधनात वाढ, सेवेत कायम करणे, अंशकालीन नावात बदल करावे, रिक्त पदांवर वारसदारांना प्रथम प्राधान्य देण्यात यावे, दरवर्षी गणवेष व भाऊबिजेसाठी 2000 रुपये देण्यात यावेत, दर महिन्याच्या 5 तारखेच्या आत मानधन अदा करावे या प्रमुख मागण्यांसाठी हे आंदोलन आझाद मैदान येथे सुरू आहे. सलग पाच दिवस हे आंदोलन सुरूच होते. यासाठी जिल्हाभरातून दीडशे महिला परिचर या आंदोलनात सहभागी झाल्या आहेत. यामध्ये संघटनेचे जिल्हाध्यक्ष आकांक्षा कांबळे, सुप्रिया पवार, संचिता घवाळी, जया तोडणकर, स्वराली आग्रे, श्रृतिका सावंत, नम्रता नार्वेकर, विनया कदम, कुंदा सिगम, आश्विनी यादव, मोहिनी सुर्वे, रेमा कांबळे, प्रमिला जाधव, विद्या पवार, मिनाक्षी मोहिनी, मनिषा नार्वेकर आदी उपस्थित होत्या. आम्ही 1966 साली अवघ्या 50 रुपये मासिक मानधनावर काम करीत आलो. आज अवघ्या 3000 पगारावर काम करत आहोत. ग्रामीण दुर्गम भागात काम करणार्या महिलांना किमान वेतन मिळावे ही प्रमुख आमची मागणी असून जोपर्यंत मागण्या पूर्ण होत नाहीत तोपर्यंत आम्ही हे मैदान सोडणार नसून हे आंदोलन सुरूच राहणार आहे, अशी माहिती जिल्हाध्यक्ष आकांंक्षा कांबळे यांनी दिली.