राज्य, केंद्र योजनांमधून जिल्ह्याला 1578 कोटी
रत्नागिरी:- राज्य, केंद्र सरकारच्या विविध योजनांमधून जिल्ह्याला तब्बल १५७८ कोटींचा निधी प्राप्त झाला आहे. त्यात रस्ते, शाळा दुरुस्ती, शाळांच्या नव्या इमारती, साकव, आपत्ती निवारणासाठी आवश्यक उपाययोजना, प्राथमिक आरोग्य केंद्र दुरुस्ती आदी कामांचा समावेश आहे, अशी माहिती पालकमंत्री उदय सामंत यांनी पत्रकार परिषदेत दिली.
जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते म्हणाले, रत्नागिरी विधानसभा मतदार संघातील एमआयडीसीतील रस्त्यांसाठी उद्योग विभागाने निधी उपलब्ध करून दिला आहे. शिरगांव, नाचणे, मिरजोळे, टिके, निवसर, हरचेरी या गावातील रस्त्याची कामे केली जाणार आहेत. त्यासाठी ४१ कोटी मंजूर आहेत. साकव उभारण्यासाठी २० कोटी, पंतप्रधान ग्रामसडक योजनेअंतर्गत जिल्ह्याला १७१ कोटी मंजूर झाले असून रत्नागिरी तालुक्यासाठी ३० कोटी ८४ लाख, मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत २१७ कोटी, सार्वजनिक बांधकामच्या ८१ रस्त्यासाठी २०१ कोटी, पत्तन विभागाच्या २८ कामांसाठी ४२ कोटी ९५ लाख, आपत्ती निवारण योजनेअंतर्गत भूमिगत वीजवाहिन्या, बंधारे, निवाराशेड यासाठी ८३५ कोटीचा निधी प्राप्त झाला आहे.
जिल्हा परिषदेच्या रस्त्यासाठी १३५ कोटी रु., १४८ शाळाच्या दुरुस्तीसाठी ५ कोटी ३८ लाख तर सीएसआरमधून ५ कोटी तर ६७ नव्या वर्गखोल्यांसाठी ५ कोटी ६९ लाख, ८७ साकवांसाठी २३ कोटी ९७ लाख, १२ अंगणवाडी इमारतीसाठी १ कोटी ४० लाख, ३४ प्राथमिक आरोग्यकेंद्र दुरुस्तीसाठी १० कोटी ४९ लाख, १०० हेक्टर बंधाऱ्यासाठी ५ कोटी २९ लाखांचा निधी मंजूर झाला आहे. दरम्यान, चालू आर्थिक वर्षात जिल्हा नियोजनचा आराखडा २७१ कोटीचा होता. त्यामध्ये नव्या आर्थिक वर्षात २९ कोटी रुपयांनी वाढवण्यात आला आहे. त्यामुळे नवा आराखडा ३०० कोटीचा झाला आहे. त्यामध्येही वाढ होण्याची शक्यता आहे, असे सामंत यांनी सांगितले.