
तुमच्या क्रेडीट कार्डची रक्कम वाढवून देतो सांगत 29 हजारला घातला गंडा
रत्नागिरी :तुमच्या क्रेडीट कार्डची रक्कम वाढवून देण्यासाठी ऑनलाईन प्रोसेस करावी लागेल, असे सांगून २९ हजार रूपयांचा ऑनलाईन गंडा घातल्याचा प्रकार समोर आला आहे. ही घटना ३० मार्च रोजी घडली. दरम्यान आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच तक्रारदाराने शहर पोलिसांत तक्रार दाखल केली. पोलिसांच्या माहितीनुसार, ३० मार्च रोजी तक्रारदारांच्या मोबाईल क्रमांकावर साक्षी नावाच्या महिलेने फोन केला. यावेळी तुमच्या क्रेडीट कार्डची रक्कम वाढवून देण्यात येणार आहे. त्यासाठी तुम्हांला ऑनलाईन प्रोसेस करावी लागेल, असे सांगण्यात आले. त्यानुसार तक्रारदारांनी क्रेडीट कार्ड नंबर व मोबाईलवर आलेला ओटीपी समोरील महिलेला सांगितला. यावेळी तक्रारदारांच्या खात्यामधील सुमारे २९ हजार रूपये कमी झाले. या प्रकरणी शहर पोलिसांनी अज्ञात इसमाविरूद्ध गुन्हा दाखल केला. पुढील तपास पोलिसांकडून करण्यात येत आहे.