
संपामुळे जिल्ह्यातील तीन हजार शाळांना कुलूप
रत्नागिरी:- राष्ट्रीय पेन्शन स्कीम (एनपीएस) रद्द करून जुनी पेन्शन योजना (ओपीएस) लागू करावी, या प्रमुख मागणीसह विविध मागण्यांसंदर्भात मंगळवारपासून जिल्हा परिषदेच्या सर्वच विभागातील कर्मचारी बेमुदत संपावर गेले आहेत. मात्र, कंत्राटी कर्मचार्यांवर झेडपीतील विविध विभागाचा भार देण्यात आला आहे. संपामुळे नेहमी गजबजलेल्या सर्वच विभागात शुकशुकाट जाणवत होता. मात्र, अधिकारी दिवसभर कार्यालयात ठाण मांडून बसले होते. जिल्ह्यातील तीन हजार शाळांना कुलूप लागले आहे.
एकच मिशन जुनी पेन्शन या मागणीसाठी जिल्हा परिषदेच्या विविध विभागातील कर्मचारी मंगळवारपासून संपावर गेले आहेत. विविध विभागांमधील सर्व डोक्यांवर पांढर्या टोप्या घालून कर्मचारी जिल्हा परिषदेच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर बुधवारीसुद्धा उपस्थित होते.
यावेळी जिल्हा परिषदेच्या विविध संघटनांच्या समन्वय समितीची द्वारसभा होवून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
जिल्हा परिषदेच्या सामान्य प्रशासन विभाग, ग्रामपंचायत विभाग, कृषी, महिला बालकल्याण विभाग, पशुसंवर्धन विभाग, बांधकाम उत्तर व बांधकाम दक्षिण विभाग, अर्थ विभाग, प्राथमिक शिक्षण विभाग, आरोग्य विभाग, समाजकल्याण विभाग, ग्रामीण पाणी पुरवठा विभाग, माध्यमिक शिक्षण विभाग, पाणी व स्वच्छता विभाग, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा यासह अन्य विभागातील कर्मचारी संपावर गेल्याने कार्यालयात सर्वत्र शुकशुकाट जाणवत होता. मात्र, काही खातेप्रमुखांनाच आपल्या कार्यालयाची कुलपे काढावी लागली. दिवसभर आपापल्या कार्यालयात सर्व कार्यालयप्रमुख ठाण मांडून बसले होते. या अधिकार्यांना स्वतःच कार्यालयातील सर्व कामे करावी लागत होती. त्यामुळे या अधिकार्यांच्या दिमतीला प्रत्येकी 1 कंत्राटी कर्मचारी देण्यात आला
होता. या कंत्राटी कर्मचार्यांसमवेत कार्यालयीन कामकाज सुरू होते. जिल्हा परिषद भवनात नेहमी नागरिकांसह अधिकारी व कर्मचार्यांची वर्दळ असते. आज मात्र सर्वत्र शुकशुकाट जाणवत होता. दिवसभर कार्यालयात कामानिमित्त येणार्या नागरिकांना संपाचा फटका बसला.
अनेकांना काम न झाल्याने त्यांना रिकाम्या हाताने घरी परतावे लागले. त्यामुळे संप कधी मिटतोय याकडे सर्वांचे डोळे लागून राहिले आहेत. जिल्हा परिषद व पंचायत समितीचे एकूण 10 हजार कर्मचारी तसेच 7 हजार शिक्षक सहभागी झाले होते.
जिल्ह्यातील प्राथमिक व माध्यमिक 3 हजार 100 शाळा आहेत. त्यापैकी फक्त 100 शाळा सुरू होत्या. 3 हजार शाळा बंद होत्या. यामुळे ऐन परीक्षेच्या कालावधीत विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे.
झेडपी, पंचायत समित्यांमधील 100 टक्के कर्मचारी संपात
जिल्हा परिषदेच्या सर्व विभागासह रत्नागिरी, मंडणगड, दापोली, खेड, चिपळूण, गुहागर, संगमेश्वर, लांजा, राजापूर या 9 पंचायत समित्यांमधील सर्व कर्मचारी संपात सहभागी झाले आहेत. त्यामुळे जिल्हा परिषद तसेच पंचायत समित्यांमध्ये संपाला चांगला प्रतिसाद मिळाला.