रत्नागिरीत सीएनजी पंपांवर वाहनांच्या दोन किलोमीटरपर्यंत रांगा, ‘सीएनजी संपले’च्या फलकांमुळे चालक हैराण
रत्नागिरी : दिवाळीच्या सुट्ट्यांमुळे कोकणात पर्यटकांचा ओघ मोठ्या प्रमाणात वाढला असतानाच अपुऱ्या गॅस पुरवठ्यामुळे रत्नागिरी जिल्ह्यात सीएनजीचा तीव्र तुटवडा निर्माण झाला आहे. ऐन पर्यटन हंगामात गॅसचा मुबलक साठा उपलब्ध नसल्याने जिल्हाभरातील सर्वच सीएनजी पंपांवर वाहनांच्या एक ते दोन किलोमीटरपर्यंत लांबच लांब रांगा लागल्या आहेत. तासन्तास रांगेत ताटकळत उभे राहूनही गॅस मिळत नसल्याने पर्यटक, स्थानिक रहिवासी, नोकरदार आणि रिक्षा व्यावसायिकांना मोठा आर्थिक व मानसिक मनस्ताप सहन करावा लागत आहे.

दिवाळी पाडवा आणि भाऊबीजेचा सण साजरा केल्यानंतर सुट्ट्यांचा आनंद लुटण्यासाठी पर्यटक आपल्या चारचाकी गाड्या आणि मिनीबस घेऊन रत्नागिरी, गणपतीपुळे, गुहागर आणि दापोली या समुद्रकिनारी भागांत मोठ्या संख्येने दाखल झाले आहेत. मात्र, या वाढत्या वाहनांच्या संख्येच्या तुलनेत गॅसचा पुरवठा अपुरा पडत असल्याने संपूर्ण जिल्ह्याची वाहतूक व्यवस्था विस्कळीत झाली आहे. रत्नागिरी शहरातील माळनाका, एमआयडीसी जे. के. फाईल्स, हातखंबा आणि नाचणे यांसह चिपळूण, खेड, लांजा आणि पाली येथील सीएनजी पंपांवर वाहनांची प्रचंड गर्दी उसळली आहे. अनेक पंपांवर गॅस संपल्याने ‘सीएनजी संपले’ असे फलक लावले जात आहेत, परिणामी तासन्तास रांगेत उभ्या असलेल्या चालकांचा मोठा हिरमोड होत असून, गॅस रिफिलिंगच्या गाड्या येईपर्यंत अनेक चालक पंपावरच तळ ठोकून बसले आहेत.

सणासुदीच्या आणि पर्यटनाच्या ऐन हंगामात सीएनजीची टंचाई निर्माण होऊ नये, यासाठी जिल्हा प्रशासन आणि पंप चालकांनी वेळीच योग्य नियोजन करणे अत्यंत गरजेचे होते. परंतु, दरवर्षीप्रमाणे यंदाही गॅस भरण्यासाठी किलोमीटरपर्यंत रांगा लावाव्या लागत असल्याने स्थानिक नागरिक आणि चाकरमानी चांगलेच त्रस्त झाले आहेत. या टंचाईचा सर्वाधिक आर्थिक फटका रत्नागिरी, चिपळूण, खेड आणि दापोली परिसरातील स्थानिक रिक्षाचालकांना बसत असून, प्रवासी वाहतूक करून व्यवसाय करण्याऐवजी त्यांचा महत्त्वाचा वेळ केवळ पंपावरील रांगेतच वाया जात असल्याने संताप व्यक्त केला जात आहे.