श्वासाच्या त्रासाने खालगाव-जाकादेवी येथील चिमुकल्याचा मृत्यू
रत्नागिरी ः तालुक्यातील खालगाव-जाकादेवी येथील एक महिना सात दिवसांच्या चिमुकल्याला श्वास घेण्यास त्रास जाणवू लागल्याने तात्काळ त्याला उपचारासाठी खासगी हॉस्पिटल येथे दाखल केले. अधिक उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले असता तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला तपासून मृत घोषित केले. शौर्य रोहन गोसावी असे मृत चिमुकल्याचे नाव आहे. ही घटना रविवारी (ता. १५) सकाळी साडेआठच्या सुमारास जिल्हा रुग्णालयात घडली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार शौर्य हा सकाळी सहा वाजता झोपेतून उठून रडू लागला म्हणून मातेने अंगावरचे दूध पाजले. त्यानंतर तो झोपला. सकाळी सात वाजता त्याला उठवण्याचा प्रयत्न केला असता तो उठला नाही. श्वास घेत नसल्याने त्याला खासगी हॉस्पिटल त्यानंतर जिल्हा रुग्णालयात दाखल केले होते. तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून मृत घोषित केले. ग्रामीण पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.