उदय सामंत यांच्या पुढाकाराने रत्नागिरीच्या विद्यार्थ्यांचे अमेरिकेला उड्डाण
अवघ्या काही तासांत सुटला तांत्रिक पेच
रत्नागिरी:
आकाशात झेप घेण्याचे आणि अमेरिकेतील ‘नासा’ या जागतिक अंतराळ संशोधन संस्थेला भेट देण्याचे रत्नागिरीच्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे स्वप्न ऐन उड्डाणाच्या दिवशीच तांत्रिक नियमांच्या फेऱ्यात अडकले होते. मात्र, राज्याचे उद्योगमंत्री तथा रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री ना. उदय सामंत यांनी दाखवलेली कमालीची तत्परता आणि थेट अमेरिकन दूतावासाशी साधलेला संवाद यामुळे हा मोठा पेच अवघ्या काही तासांत सुटला. परिणामी, रत्नागिरी जिल्हा परिषद शाळांतील २६ गुणवंत विद्यार्थ्यांचे अमेरिकेच्या दिशेने यशस्वी उड्डाण झाले असून, सर्व स्तरांतून पालकमंत्र्यांच्या या संवेदनशील कार्यशैलीचे कौतुक होत आहे.
रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या वतीने सलग चौथ्या वर्षी १४ मुली व १२ मुले असे एकूण २६ विद्यार्थी आणि अधिकारी १२ डिसेंबर रोजी रात्री १०.३० च्या विमानाने अमेरिकेला रवाना होणार होते. विमानाची तिकिटे, अमेरिकेतील निवास आणि ‘नासा’मधील सर्व अभ्यास दौऱ्याचे नियोजन पूर्ण झाले होते. मात्र, १२ डिसेंबर रोजी सकाळी जेव्हा विद्यार्थी आणि अधिकारी व्हिसा मंजूर झालेले पासपोर्ट ताब्यात घेण्यासाठी संबंधित केंद्रावर गेले, तेव्हा त्यांना धक्का बसला. “नवीन नियमानुसार प्रत्यक्ष पालक सोबत असल्याशिवाय अल्पवयीन मुलांचे पासपोर्ट दिले जाणार नाहीत,” असे केंद्राकडून सांगण्यात आले. यापूर्वीच्या तीनही दौऱ्यांमध्ये असा नियम नसल्याने प्रशासनाची मोठी कोंडी झाली. २३ विद्यार्थ्यांचे पालक तात्काळ मुंबईत उपस्थित नसल्याने अवघ्या काही तासांवर आलेला हा ऐतिहासिक दौरा रद्द होतो की काय, अशी भीती निर्माण झाली होती. विद्यार्थी व अधिकाऱ्यांचे चेहरे चिंतेने काळवंडले होते.
ही आणीबाणीची परिस्थिती तात्काळ पालकमंत्री ना. उदय सामंत यांच्या कानावर घालण्यात आली. विद्यार्थ्यांच्या भविष्याचा आणि स्वप्नांचा प्रश्न असल्याचे ओळखून ना. सामंत यांनी क्षणाचाही विलंब न लावता सूत्रे हलवली. त्यांनी तातडीने ‘व्हीएफएस ग्लोबल’ कार्यालयाशी संपर्क साधला आणि त्यांच्यामार्फत अमेरिकन दूतावासाकडे विशेष परवानगीसाठी तातडीचा अर्ज सादर करवून घेतला.
ना. सामंत यांनी केलेल्या प्रभावी पाठपुराव्यामुळे अमेरिकन दूतावासानेही या प्रकरणाचे गांभीर्य ओळखून तात्काळ सकारात्मक प्रतिसाद दिला आणि विशेष परवानगी मंजूर केली. परिणामी, अवघ्या काही तासांतच सर्व विद्यार्थ्यांचे व्हिसा स्टॅम्प झालेले पासपोर्ट प्रशासनाच्या ताब्यात सुखरूप मिळाले.
ग्रामीण गुणवत्तेला मिळाले बळ
पासपोर्ट हातात पडताच अधिकारी, विद्यार्थी आणि रत्नागिरीत चिंतेत असलेल्या पालकांनी मोठा सुटकेचा निश्वास टाकला आणि रात्री १०.३० च्या विमानाने सर्व चमू अमेरिकेसाठी रवाना झाला. “ग्रामीण भागातील सामान्य कुटुंबातील मुले परदेशात जाऊन विज्ञान आणि अंतराळ संशोधन शिकत आहेत, त्यांच्या या स्वप्नात कोणताही अडथळा येऊ देणार नाही,” ही भावना पालकमंत्र्यांनी कृतीतून सिद्ध केली आहे. त्यांच्या या तत्पर मध्यस्थीबद्दल पालक वर्ग आणि शिक्षण क्षेत्रातून त्यांचे विशेष आभार मानले जात आहेत.