डोंगरावरून कोसळलेल्या दगडामुळे चिमुरडीचा मृत्यू
मार्लेश्वर येथील घटना; वडील जखमी
देवरुख : श्री क्षेत्र मार्लेश्वर येथे देवदर्शनासाठी आलेल्या सांगली जिल्ह्यातील कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. मंदिर परिसरात डोंगरावरून अचानक मोठा दगड कोसळल्याने सहा वर्षांच्या चिमुरडीचा जागीच मृत्यू झाला, तर तिचे वडील जखमी झाले. रुत्वी संदीप पाटील (वय ६, रा. कापूसखेड, ता. वाळवा, जि. सांगली) असे मृत बालिकेचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील कापूसखेड येथील संदीप पाटील हे रविवारी आपल्या कुटुंबासह श्री क्षेत्र मार्लेश्वर येथे देवदर्शनासाठी आले होते. मंदिर परिसरात असताना अचानक डोंगराच्या कड्यावरून मोठा दगड निसटून खाली कोसळला. या दगडाचा जोरदार मार लागल्याने रुत्वी गंभीर जखमी झाली. मात्र, वर्मी मार लागल्याने या दुर्घटनेत तिचा जागीच मृत्यू झाला. तिचे वडील संदीप पाटील हे देखील या घटनेत जखमी झाले आहेत.
घटनेची माहिती मिळताच स्थानिक ग्रामस्थ, देवस्थान समितीचे कार्यकर्ते आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले. जखमी संदीप पाटील यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले.
सध्या पर्यटन हंगाम सुरू असल्याने श्री क्षेत्र मार्लेश्वर येथे राज्याच्या विविध भागांतून मोठ्या संख्येने भाविक आणि पर्यटक भेट देत आहेत. अशा परिस्थितीत डोंगरावरून दगड कोसळण्याच्या दुर्घटनेमुळे परिसरातील पर्यटकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. सहा वर्षांच्या चिमुरडीचा अशा दुर्दैवी घटनेत मृत्यू झाल्याने सांगली जिल्ह्यातील कापूसखेड गावासह संपूर्ण संगमेश्वर तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे.