रमजान गोलंदाज यांच्या नवनिर्मिती फाउंडेशनला ‘नॅशनल एक्सलंट सोशल अवॉर्ड २०२६’ जाहीर
सामाजिक, शैक्षणिक व लोकहिताच्या कार्याची राष्ट्रीय स्तरावर दखल
रत्नागिरी : सामाजिक, शैक्षणिक आणि जनहिताच्या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या नवनिर्मिती फाउंडेशन, उक्षी (जि. रत्नागिरी) या संस्थेच्या कार्याची राष्ट्रीय स्तरावर दखल घेण्यात आली असून, संस्थेला प्रतिष्ठेचा ‘नॅशनल एक्सलंट सोशल अवॉर्ड २०२६’ जाहीर झाला आहे. कला पर्यटन व सांस्कृतिक महोत्सव समिती, महाराष्ट्र राज्य (रजि.) यांच्या वतीने आयोजित ‘युवा परिवर्तन परिषद व गौरव सोहळा – डोंबिवली २०२६’ अंतर्गत या पुरस्कारासाठी नवनिर्मिती फाउंडेशनची सन्माननीय निवड करण्यात आली आहे.
संस्थेने समाजाच्या उन्नतीसाठी केलेले उल्लेखनीय कार्य, सामाजिक योगदान आणि कार्यकर्तृत्वाची दखल घेऊन हा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. विविध सामाजिक उपक्रम, शैक्षणिक कार्य, गरजू व वंचित घटकांना मदत, महिला सक्षमीकरण, आरोग्य, पर्यावरण आणि समाजातील दुर्बल घटकांच्या विकासासाठी संस्थेच्या माध्यमातून सातत्याने कार्य केले जात आहे.
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना इंग्रजी माध्यमातून शिक्षणाची संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने संस्थेच्या माध्यमातून अंबेड बुद्रुक येथे न्यू व्हिजन इंग्लिश मीडियम स्कूल चालविण्यात येत आहे. तसेच गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत, ज्येष्ठ नागरिकांना धान्य व जीवनावश्यक वस्तूंचे वाटप, रक्तदान, आरोग्यविषयक उपक्रम आणि विविध सामाजिक उपक्रम राबविले जात आहेत.
या पुरस्काराचा सन्मान सोहळा रविवार, दिनांक १५ नोव्हेंबर २०२६ रोजी सकाळी १०.३० वाजता श्री गणेश संस्थान, रेल्वे स्टेशनजवळ, डोंबिवली (पूर्व), जि. ठाणे येथे आयोजित करण्यात आला आहे. सुप्रसिद्ध ज्येष्ठ अभिनेते मा. सुनील गोडबोले यांच्या शुभहस्ते हा सन्मान प्रदान करण्यात येणार आहे.
नवनिर्मिती फाउंडेशनला मिळालेला हा राष्ट्रीय पुरस्कार म्हणजे केवळ संस्थेचा सन्मान नसून, रत्नागिरी जिल्ह्यातील ग्रामीण भागातून सामाजिक परिवर्तनासाठी कार्य करणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांच्या योगदानाचा गौरव आहे. या पुरस्कारामुळे संस्थेच्या सामाजिक कार्याला अधिक प्रोत्साहन मिळणार असून, भविष्यातही समाजहिताचे विविध उपक्रम अधिक जोमाने राबविण्याची प्रेरणा मिळणार आहे.
नवनिर्मिती फाउंडेशनच्या या निवडीबद्दल जिल्ह्यातील सामाजिक, शैक्षणिक व विविध क्षेत्रांतून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. सदरील पुरस्कर स्वीकारण्यासाठी संस्थेचे सचिव राजेश आंबेकर, निलेश जाधव आणि इतर पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत