आनंदाची प्रकाशमय पहाट बेघरांच्या आयुष्यात!
संपर्क युनिक फाउंडेशनतर्फे रत्नागिरीत अनोखी दिवाळी साजरी
रत्नागिरी:
दिवाळी म्हणजे प्रकाशाचा, मांगल्याचा आणि आनंदाचा सण. सर्वत्र दिव्यांची रोषणाई, फटाक्यांची आतषबाजी आणि फराळाचा घमघमाट सुरू असताना समाजातील एका घटकाच्या नशिबी मात्र हा आनंद उपभोगता येत नाही. घरातून मुला-मुलींनी काढून टाकलेले, स्वतःचे घर नसलेले, जगात कोणीही नातेवाईक नसलेले आणि एकाकी आयुष्य जगणारे अनेक बेघर लोक आजही आपल्या अवतीभोवती आहेत. अशा उपेक्षित आणि निराधार लोकांच्या आयुष्यात आनंदाचा प्रकाश कसा पसरवता येईल, या विचाराने रत्नागिरीतील ‘संपर्क युनिक फाउंडेशन’च्या कार्यकर्त्यांनी यंदाची दिवाळी या बेघरांसोबत साजरी करून समाजात संवेदनशीलतेचा एक नवीन आदर्श निर्माण केला आहे.
या स्तुत्य उपक्रमाची पाळेमुळे संस्थेचे अध्यक्ष शकील गव्हाणकर यांच्या मनात निर्माण झालेल्या एका विचारात आहेत. सणाचा आनंद प्रत्येकाच्या चेहऱ्यावर उमटला पाहिजे, अशी भावना गव्हाणकर यांच्या मनात आली. त्यांनी तात्काळ संस्थेचे सल्लागार आणि गोरगरिबांचे कैवारी म्हणून ओळखले जाणारे सचिन शिंदे यांच्याशी संपर्क साधला. सचिन शिंदे यांनी वेळ न दवडता रत्नागिरी शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या आठवडा बाजार येथील नगर परिषदेच्या ‘बेघर निवाऱ्यात’ जाऊन तेथील लोकांसाठी दिवाळी साजरी करण्याची संकल्पना मांडली. ही कल्पना सर्वांनाच पटली आणि सायंकाळी ५ वाजता बेघर निवाऱ्यात एकत्र जमण्याचे ठरले.
या उपक्रमासाठी संस्थेच्या सर्व सदस्यांना तात्काळ निरोप देण्यात आले. उपक्रमाचे स्वरूप ठरल्यानंतर फराळाची व्यवस्था करण्यासाठी सचिन शिंदे, युसुफ शिरगावकर, जमीर खलफे, इस्माईल नाकाडे आणि कांचन मालगुंडकर यांनी अत्यंत मोलाचे सहकार्य केले. या बेघर निवाऱ्यात सध्या ७ महिला आणि १५ पुरुष असे एकूण २२ निराधार नागरिक वास्तव्यास आहेत. या सर्वांसाठी ‘किचन एक्सप्रेस रत्नागिरी’च्या जैबा बंदरकर यांनी अत्यंत आवडीने आणि आपुलकीने शाकाहारी पुलावचे जेवण देण्याचे कबूल केले आणि ते उपलब्ध करून दिले.
ठरल्याप्रमाणे सायंकाळी फराळ आणि भोजनाचे साहित्य घेऊन संपर्क युनिक फाउंडेशनची टीम बेघर निवाऱ्यात पोहोचली. याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष शकील गव्हाणकर, कांचन मालगुंडकर, युसुफ शिरगावकर, इस्माईल नाकाडे, जमीर खलफे, आयान कोंडकरी आणि मंथन मालगुंडकर हे प्रत्यक्ष उपस्थित होते. तर काही सभासदांनी सण आणि वैयक्तिक कामांमुळे उपस्थित राहता येत नसल्याचे आधीच कळवून उपक्रमास शुभेच्छा दिल्या होत्या.
बेघर निवाऱ्याच्या कार्यालय प्रमुख शिवानी पवार यांनी निवाऱ्यातील लोकांची परिस्थिती आणि व्यवस्थेबद्दल सविस्तर माहिती दिली. यानंतर फाउंडेशनच्या सदस्यांनी तेथील सर्व २२ बेघर नागरिकांना दिवाळीचा फराळ व भोजनाचे वाटप केले. त्यांच्यासोबत काही वेळ घालवून त्यांच्या सुख-दुःखाच्या गोष्टी ऐकून घेतल्या. ज्यांना सणाच्या दिवशी स्वतःचे घर आणि नातेवाईक आठवून एकाकीपणा जाणवत होता, त्यांना जेव्हा या कार्यकर्त्यांनी आपुलकीने जवळ केले, तेव्हा अनेक बेघरांच्या डोळ्यांतून अश्रू अनावर झाले. आपल्या पाठीशीही कोणीतरी उभे आहे या भावनेने त्यांच्या अश्रूंमधूनच तृप्तीचे आणि आनंदाचे हास्य फुलले.
संपर्क युनिक फाउंडेशनच्या या सामाजिक उपक्रमांमुळे समाजातील शोषितांना मोठा दिलासा मिळत आहे. संस्थेच्या अशा विविध सामाजिक उपक्रमांसाठी नेहमीच फिरोज कोंडकरी,नदीम शेख आणि आदील शिरगावकर यांचे मोलाचे सहकार्य लाभत असते, त्याबद्दल संस्थेच्या वतीने त्यांचे विशेष आभार मानण्यात आले. बेघरांच्या चेहऱ्यावर उमटलेले ते निर्मळ हास्य हीच यंदाच्या दिवाळीची सर्वात मोठी भेट ठरल्याची भावना व्यक्त करत संपर्क युनिक फाउंडेशनने यंदाची दिवाळी अत्यंत अर्थपूर्ण आणि आनंददायी पद्धतीने साजरी केली.