दुचाकींची समोरासमोरधडक ; एकाचा मृत्यू
चिपळूण : तालुक्यातील पिंपळी बुद्रुक येथे दोन दुचाकींची समोरासमोर जोरदार धडक होऊन झालेल्या अपघातात अशोक कृष्णा राणे (वय ५६, रा. कोळकेवाडी, जोशीवाडी) यांचा मृत्यू झाला. या अपघातात दुसरा दुचाकीस्वार संजय श्रीकांत पवार (वय ४०, रा. नांदीवसे, गणेशपुरवाडी) हा जखमी झाला आहे. शुक्रवारी (दि. ७) सकाळी ९.४५ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, अशोक राणे हे आपल्या दुचाकीने कोळकेवाडी येथून शिरगाव येथे पेट्रोल भरण्यासाठी गेले होते. पेट्रोल भरून घरी परतत असताना पिंपळी बुद्रुक येथे शिरगावहून चिपळूणच्या दिशेने जाणाऱ्या एचएफ डीलक्स दुचाकीने त्यांच्या मोटारसायकलला समोरून जोरदार धडक दिली. दुसरा दुचाकीस्वार संजय पवार हा भरधाव वेगाने आणि वाहतुकीच्या नियमांकडे दुर्लक्ष करून वाहन चालवत असल्याने हा अपघात झाल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
या धडकेत अशोक राणे हे रस्त्यावर पडून गंभीर जखमी झाले. अपघातानंतर त्यांना १०८ रुग्णवाहिकेतून कामथे येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी तपासणीनंतर त्यांना उपचारापूर्वीच मृत घोषित केले. दुसरा दुचाकीस्वार संजय पवार याच्यावर कामथे उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
या प्रकरणी मृत अशोक राणे यांचे पुत्र संकेत राणे (वय २७) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून संजय श्रीकांत पवार याच्याविरुद्ध अलोरे-शिरगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अपघाताचा पुढील तपास पोलीस करीत आहेत.