झाडगावमध्ये २५ फुटी नरकासुराचा थरार
चंदेरी रथातून अवतरलेल्या श्रीकृष्णाने केला वध
रत्नागिरी : दीपावलीच्या पूर्वरात्री झाडगाव भैरीच्या सहाण परिसरात अधर्मावर धर्माच्या विजयाचा थरार अनुभवायला मिळाला. आली लहर केला कहर – झाडगाव या मंडळाने आणि झाडगाव ग्रामस्थांनी साकारलेल्या २५ फुटी भव्य नरकासुराचे दहन हजारो रत्नागिरीकरांच्या साक्षीने करण्यात आले.
यंदाच्या दहनाचे वैशिष्ट्य म्हणजे केवळ पुतळा जाळण्यापुरता हा कार्यक्रम मर्यादित नव्हता. सजवलेल्या चंदेरी रथामधून साक्षात श्रीकृष्ण अवतरले आणि नरकासुराबरोबर घनघोर युद्धाचा प्रसंग साकारण्यात आला. प्रत्यक्ष रणसंग्रामाचा थरार आणि त्यानंतर नरकासुराचे दहन पाहून उपस्थितांनी टाळ्यांचा कडकडाट केला.
पौराणिक कथेचा बोध घेत वर्तमानातील वाईट प्रवृत्ती, चुकीच्या रूढी, सामाजिक अराजकता, द्वेष-मत्सर यांचे दहन करून धर्माचा विजय कसा होतो, हा संदेश देण्याचा प्रयत्न मंडळाने या माध्यमातून केला. हा २५ फुटी अक्राळ-विक्राळ नरकासुर घडवण्यासाठी आली लहर केला कहर मंडळाच्या तरुणांनी आणि ग्रामस्थांनी गेल्या महिनाभरापासून अहोरात्र मेहनत घेतली होती. फटाक्यांची आतषबाजी, ढोल-ताशाच्या गजरात संपूर्ण झाडगाव परिसर दिवाळीच्या उत्साहात न्हाऊन निघाला होता.