कागल ते रत्नागिरी प्रवास अवघ्या एका तासात
‘डीपीआर’ तयार करण्याचे नितीन गडकरींचे निर्देश
रत्नागिरी: रत्नागिरी आणि कोल्हापूरदरम्यानचा खडतर अन् वळणावळणाचा प्रवास आता भविष्यात अधिक वेगवान आणि सोपा होणार आहे. आंबा घाटातील अवघड प्रवासाला पर्याय म्हणून बोगदा उभारण्यासाठी प्रशासकीय पातळीवर हालचाली सुरू झाल्या आहेत. केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी या टनेलच्या सविस्तर प्रकल्प अहवालासाठी सूचना दिल्या आहेत. हा प्रकल्प पूर्ण झाल्यास कागल ते रत्नागिरी हा प्रवास अवघ्या एका तासात शक्य होईल, असा विश्वास उद्योगमंत्री उदय सामंत यांनी व्यक्त केला आहे.
कोल्हापूर येथे एका कार्यक्रमामध्ये त्यांनी ही माहिती दिली. रत्नागिरी-कोल्हापूर प्रवासादरम्यान आंबा घाटातील रस्ता आणि वेळेची बचत हा नेहमीच चिंतेचा विषय राहिला आहे. या संदर्भात सामंत म्हणाले, ”आंबा घाटात टनेल होईल की नाही, अशी शंका अनेकांच्या मनात होती. यावर तोडगा काढण्यासाठी दोन महिन्यांपूर्वी दिल्लीत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेतली. गडकरी यांनी तातडीने या टनेलचा डीपीआर तयार करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यामुळे येत्या काही वर्षांत हा प्रवास अतिशय सोपा आणि सुरक्षित होणार आहे.