मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानात कळसवली ग्रामपंचायतीची जिल्ह्यात बाजी; ५० लाखांचा प्रथम पुरस्कार जाहीर
पाचल :07 नोव्हेंबर (वार्ता)
मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान २०२५-२६ अंतर्गत राजापूर तालुक्यातील कळसवली ग्रामपंचायतीने रत्नागिरी जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकावत ५० लाख रुपयांच्या जिल्हास्तरीय अत्युत्कृष्ट ग्रामपंचायत पुरस्कारावर आपले नाव कोरले आहे. ग्रामपंचायतीने गेल्या काही वर्षांत सातत्याने राबविलेल्या विविध विकासकामांची, शासकीय योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीची आणि व प्रशासकीय नियोजनाची शासनस्तरावर दखल घेण्यात आली आहे. ग्रामविकास विभागाने ६ नोव्हेंबर रोजी जाहीर केलेल्या शासन निर्णयातून या पुरस्कारासाठी कळसवली ग्रामपंचायतीची निवड निश्चित झाली.
या स्पर्धेत मंडणगड तालुक्यातील तोंडली ग्रामपंचायतीने द्वितीय, तर दापोली तालुक्यातील आसूद ग्रामपंचायतीने तृतीय क्रमांक मिळवला आहे. त्यानुसार तोंडली ग्रामपंचायतीला ३० लाख रुपये, तर आसूद ग्रामपंचायतीला २० लाख रुपयांचे पारितोषिक मिळणार आहे.
(कळसवली ग्रामपंचायत इमारत) कळसवली ग्रामपंचायतीने गावातील स्वच्छता, पाणी व्यवस्थापन, वृक्षगणना, डिजिटल कामकाज तसेच विविध शासकीय योजनांची प्रभावी अंमलबजावणी यांसारख्या क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी केली. अभियानांतर्गत निश्चित करण्यात आलेल्या विविध निकषांची पूर्तता करत ग्रामपंचायतीने जिल्ह्यात अव्वल स्थान मिळवले. या यशामागे ग्रामपंचायतीचे पदाधिकारी, सरपंच, ग्राम अधिकारी आणि कर्मचारी यांचे योगदान महत्त्वाचे ठरले. पंचायत समिती स्तरावरील अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन, सातत्यपूर्ण पाठपुरावा तसेच जिल्हा परिषद ग्रामपंचायत विभागाचे नियोजन आणि समन्वय यांचाही या यशात मोलाचा वाटा आहे.
या पुरस्काराबाबत प्रतिक्रिया व्यक्त करताना सरपंच देवेश तळेकर यांनी हा सन्मान कोणत्याही एका व्यक्तीचा नसून संपूर्ण गावाचा असल्याचे सांगितले. ग्रामपंचायतीने राबविलेल्या प्रत्येक उपक्रमात ग्रामस्थांनी सक्रिय सहभाग घेत सहकार्य केले. विशेषतः ग्राम अधिकारी सोनाली आरख यांच्या कामाचा या यशात मोठा वाटा असल्याचे त्यांनी नमूद केले. ग्रामपंचायत अधिकारी सोनाली आरख यांच्या नियोजनबद्ध कामकाजाचे, मेहनतीचे आणि सातत्यपूर्ण पाठपुराव्याचेही कौतुक होत आहे. त्यांच्या योगदानाबद्दल त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.
मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाच्या माध्यमातून ग्रामीण भागातील विकासकामांना चालना देण्यासाठी ग्रामपंचायतींच्या कामगिरीचे तालुका, जिल्हा, विभाग आणि राज्य अशा विविध स्तरांवर मूल्यमापन करण्यात आले. या प्रक्रियेत कळसवली ग्रामपंचायतीने जिल्ह्यात प्रथम क्रमांक मिळवून आपली कार्यक्षमता सिद्ध केली आहे.
५० लाख रुपयांचा प्रथम पुरस्कार मिळाल्याने कळसवली ग्रामपंचायतीच्या आगामी विकासकामांना आर्थिक बळ मिळणार आहे. या पुरस्कारामुळे गावाच्या सामूहिक प्रयत्नांना शासनस्तरावर मान्यता मिळाली असून, भविष्यातही विकासाच्या विविध क्षेत्रांत अधिक प्रभावी कामगिरी करण्यासाठी ग्रामपंचायतीला नवी प्रेरणा मिळणार आहे.