खेडमध्ये १४ गावांची पाण्याची प्रतीक्षा संपणार
पोयनार लघुपाटबंधारे प्रकल्पासाठी २६५ कोटींचा निधी मंजूर
रत्नागिरी:
खेड तालुक्यातील तब्बल २५ वर्षांपासून रखडलेल्या पोयनार लघु पाटबंधारे प्रकल्पाच्या कामाला अखेर पूर्ण गती मिळाली असून, २६५ कोटी ४८ लाख रुपयांच्या द्वितीय सुधारित प्रशासकीय मान्यतेचे भूमिपूजन गृह व महसूल राज्यमंत्री योगेश कदम यांच्या हस्ते उत्साहात संपन्न झाले. या प्रकल्पामुळे आगामी दोन वर्षांत परिसरातील १४ गावांचा पिण्याच्या व शेतीच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सुटणार असल्याचे प्रतिपादन राज्यमंत्र्यांनी यावेळी केले.
पोयनार येथे आयोजित भूमिपूजन सोहळ्यात बोलताना राज्यमंत्री कदम म्हणाले, “या धरणाची एकूण पाणी साठवण क्षमता २७.८९९ दशलक्ष घनमीटर इतकी विस्तीर्ण असून, याद्वारे १४ गावांना जीवनदान मिळणार आहे. गेल्या आठ ते नऊ वर्षांपासून या प्रकल्पासाठी माझा अखंड पाठपुरावा सुरू होता. पुढील दोन वर्षांच्या कालावधीत सर्व संबंधित गावांना प्रत्यक्ष पाणी उपलब्ध करून देणे हेच आमचे प्राथमिक उद्दिष्ट आहे.”
या प्रकल्पासाठी भरीव निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांचे जाहीर आभार मानले. कोकणातील सिंचन क्रांतीचा उल्लेख करताना, मांडवे धरणासाठीही सुमारे २०० कोटींचा निधी मंजूर झाला असून रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रखडलेले सर्व जलसंपदा प्रकल्प मार्गी लावण्यासाठी शासन कटिबद्ध असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
प्रकल्पग्रस्तांना वाऱ्यावर सोडणार नाही
धरण बांधकामासोबतच प्रकल्पग्रस्तांच्या हिताची पूर्ण काळजी घेतली जाईल, अशी ग्वाही देताना श्री. कदम म्हणाले की, धरणाच्या बांधकामासोबतच बाधितांच्या पुनर्वसनाची प्रक्रिया समांतरपणे राबवली जाईल. कोणत्याही शेतकरी किंवा प्रकल्पग्रस्तावर अन्याय होऊ दिला जाणार नाही, त्यांना वाऱ्यावर सोडले जाणार नाही.
या प्रसंगी जिल्हा परिषद अध्यक्ष अस्मिता केंद्रे, माजी गृहमंत्री रामदास कदम, माजी आमदार संजय कदम यांच्यासह विविध क्षेत्रांतील लोकप्रतिनिधी, शासकीय अधिकारी आणि परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.