जिल्ह्यातील सर्व पोलिस ठाण्यांत ‘बालस्नेही कक्ष’
लवकरच मुलांसाठी सुरू होणार काम
रत्नागिरी
रत्नागिरी जिल्हा पोलिस दलाने लहान मुलांच्या मनातील पोलिसांविषयीची भीती आणि संकोच दूर करण्यासाठी एक महत्त्वपूर्ण उपक्रम हाती घेतला आहे. जिल्ह्यातील सर्व १८ पोलिस ठाण्यांमध्ये स्वतंत्र ‘बालस्नेही कक्ष’ उभारण्यात आले असून लवकरच हे कक्ष पूर्ण क्षमतेने सुरू केले जातील. संकटग्रस्त अथवा पीडित बालकांना तणावमुक्त वातावरणात आपली व्यथा मांडता यावी, त्यांना तातडीने मदत मिळावी आणि घटनेची अचूक माहिती समोर यावी, या उद्देशाने हे पाऊल उचलण्यात आले आहे.
अनेकदा कोणताही अनुचित प्रकार घडल्यास लहान मुले मानसिक दडपणाखाली येतात. पोलिस ठाण्यातील खाकी वर्दीचे आणि गांभीर्याचे वातावरण पाहून मुले अधिकच घाबरतात, ज्यामुळे घडलेला प्रकार स्पष्टपणे सांगणे त्यांना कठीण जाते. ही अडचण लक्षात घेऊन शासनाच्या सूचनेनुसार रत्नागिरीतील प्रत्येक पोलिस ठाण्यात लहान मुलांसाठी विशेष आणि सुरक्षित जागा तयार करण्यात आली आहे.
या कक्षांमध्ये मुलांना हसते-खेळते व सुरक्षित वातावरण देण्यासाठी भिंतींवर आकर्षक चित्रे, खेळणी आणि गोष्टींची पुस्तके उपलब्ध करून दिली जात आहेत. या प्रसन्न वातावरणात बालकांशी आपुलकीने संवाद साधून त्यांचा विश्वास जिंकण्याचा पोलिसांचा प्रयत्न राहील. बालकांची बाजू ऐकून घेण्यासोबतच त्यांना आवश्यक कायदेशीर मार्गदर्शन आणि मानसिक आधार देणे हे या उपक्रमाचे मुख्य केंद्रस्थान आहे.
जिल्ह्यातील सर्व कक्षांची उभारणी पूर्ण झाली असून, लवकरच प्रत्यक्ष कामकाजाला सुरुवात होईल, अशी माहिती अतिरिक्त पोलिस अधीक्षक महामुनी यांनी दिली. मुलांच्या मनातील भीती दूर करून त्यांना विश्वासात घेतल्यास, पीडित बालकांना कोणत्याही संकोचाशिवाय न्याय मिळवून देणे अधिक सुलभ होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.