पाचल शाळा परिसरात बिबट्याचा वावर; ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण, वन विभागाकडून ‘ट्रॅप कॅमेरे’ तैनात
पाचल : (वार्ताहर)
राजापूर तालुक्यातील पाचल येथील जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा पाचल नंबर १ (केंद्र शाळा) आणि लगतच्या परिसरात गेल्या काही दिवसांपासून बिबट्याचा थेट वावर आढळून आल्याने संपूर्ण परिसरात तीव्र घबराट पसरली आहे. शालेय परिसर आणि भरवस्तीत बिबट्याचे दर्शन घडल्यामुळे ग्रामस्थ, शिक्षक आणि विद्यार्थ्यांमध्ये सुरक्षिततेबाबत चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते. या गंभीर परिस्थितीची दखल घेत वन विभागाने तातडीने घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली असून बिबट्याच्या हालचालींवर २४ तास नजर ठेवण्यासाठी परिसरात आधुनिक ट्रॅप कॅमेरे तैनात केले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, पाचल नंबर १ या केंद्र शाळेच्या आसपास आणि नजीकच्या लोकवस्तीत बिबट्या आल्याचे स्थानिकांच्या निदर्शनास आले होते. लहान मुले, ग्रामस्थ आणि पाळीव प्राण्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आल्यामुळे गावकऱ्यांनी या घटनेची माहिती वन विभागाला दिली. वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी व कर्मचाऱ्यांनी विलंब न लावता प्रत्यक्ष घटनास्थळाची सविस्तर पाहणी केली, पायांचे ठसे तपासले आणि प्रत्यक्षदर्शींशी चर्चा करून वस्तुस्थिती जाणून घेतली. ग्रामस्थांमधील भीतीचे वातावरण दूर करण्यासाठी आणि संभाव्य अनर्थ टाळण्यासाठी वन विभागाने तातडीने सुरक्षाविषयक उपाययोजना आखल्या आहेत.
बिबट्याचा नेमका मुक्काम, येण्या-जाण्याचा मार्ग आणि त्याच्या दैनंदिन हालचाली टिपण्यासाठी वन विभागाच्या वतीने परिसरातील मोक्याच्या ठिकाणी नाईट व्हिजन सुविधा असलेले आधुनिक ट्रॅप कॅमेरे बसवण्यात आले आहेत. या कॅमेऱ्यांच्या माध्यमातून मिळणाऱ्या फुटेजच्या आधारे बिबट्याचा वावर स्पष्ट झाल्यानंतर पुढील आवश्यक ती कारवाई केली जाणार असल्याचे वन कर्मचाऱ्यांकडून सांगण्यात आले आहे. दरम्यान, शालेय वेळेत आणि रात्रीच्या वेळी नागरिकांनी सतर्क राहावे, शेतात जाताना किंवा घराबाहेर पडताना पुरेशी काळजी घ्यावी आणि अफवांवर विश्वास न ठेवता कोणत्याही संशयास्पद हालचाली दिसल्यास तत्काळ वन विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.