झाडांचे बारसे हा उपक्रम अनुकरणीय आणि गौरवास्पद : प्रा. डॉ. प्रदीप ढवळ
वाटद कवठेवाडी शाळेत वृक्षसंवर्धन आणि पर्यावरण रक्षण उद्देशाने वृक्षारोपण
खंडाळा : मानवाच्या उत्क्रांतीपासूनच्या इतिहासात निसर्गाने माणसाला भरभरून दिले आहे. त्यातून मानवी समाजाची प्रगती मोठ्या प्रमाणात झाली आहे. अशावेळी माणसाला जगण्यासाठी आवश्यक बाबी निसर्गच देत असतो. अशावेळी त्या निसर्गाप्रति कृतज्ञता व्यक्त करण्याची जाणीव समाजातील प्रत्येक जणांमध्ये निर्माण होणे आवश्यक आहे. अशावेळी वृक्ष संवर्धन आणि पर्यावरण रक्षण यादृष्टीने या जाणिवेचे महत्व विद्यार्थ्यांना लहान वयातच समजल्यास, भविष्यात ती जाणीव विद्यार्थ्यांमध्ये कायम राहत असते. यासाठी वाटद कवठेवाडी शाळेचा झाडांचे बारसे हा उपक्रम अत्यंत स्तुत्य, अनुकरणीय आणि गौरवास्पद असून हा उपक्रम सर्वत्र ठिकाणी राबविण्यासाठी पुढाकार घेण्याची आवश्यकता असल्याचे मत महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे उपाध्यक्ष प्रा. डॉ. प्रदीप ढवळ यांनी व्यक्त केले.
ते रत्नागिरी तालुक्यातील जिल्हा परिषद आदर्श प्राथमिक शाळा वाटद कवठेवाडी या शाळेने पर्यावरण रक्षण आणि वृक्षसंवर्धन या उद्देशाने आयोजित झाडांचे बारसे या उपक्रमाच्या प्रसंगी बोलत होते.
ते पुढे म्हणाले की, कोकणातील निसर्ग हा खुप संपन्न आहे. हीच संपन्नता टिकवून ठेवण्यासाठी हा उपक्रम पूरक असून या उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी पालक, ग्रामस्थ यांची उपस्थिती ही शाळा, शाळेतील शिक्षक आणि पालक यांचा सुसंवाद दर्शविणारी आहे. म्हणून या शाळेने राबविलेला झाडांचे बारसे हा उपक्रम भविष्याच्या दृष्टीने अत्यंत उपयुक्त ठरणारा आणि दिशादर्शक आहे. शाळेने विद्यार्थी गुणवत्ता विकासासाठी राबवलेले उपक्रम, त्यादृष्टीने सजवलेली शाळा, शिक्षकांची आत्मीयता आणि पालक, ग्रामस्थ यांचा सक्रिय सहभाग पाहून खुप आनंद होत असून शाळेचे कार्य गौरवास्पद असल्याचे सांगितले.
यावेळी सर्वप्रथम स्वागत झाल्यानंतर झाडांचे बारसे करण्यात आले. लगेचच त्याच झाडांचे महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे उपाध्यक्ष प्रा. डॉ. प्रदीप ढवळ आणि इतर मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.
यावेळी उपस्थित असणारे रत्नागिरी जिल्हा बँकेचे संचालक गजानन पाटील यांनी शाळेचा मागील काही वर्षाचा इतिहास सांगत शाळेसाठी येथील पालक आणि ग्रामस्थ हे एकत्र येऊन राबवत असलेल्या शाळेतील वैविध्यपूर्ण उपक्रमाचा उल्लेख करत, झाडांचे बारसे या उपक्रमातून झाड लावल्यानंतर झाडे वाढविण्यासाठी आणि टिकवण्यासाठी होत असलेले प्रयत्नांतुन वृक्षसंर्धनाचे महत्व विद्यार्थ्यांना आणि समाजाला पटवून देण्यासाठी शाळा, पालक, ग्रामस्थ आणि शाळेतून शिक्षकांचे कार्य सर्वांसाठी आदर्शवत असल्याचे मत व्यक्त करून या उपक्रमाच्या प्रसारासाठी सर्वानी पुढाकार घ्यावा असे आवाहन केले.
याप्रसंगी उपस्थित असणाऱ्या रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या सदस्या उषा सावंत यांनीही उपक्रमाचे कौतुक करून वृक्ष संवर्धन करण्याचे उपयोग सांगताना वाटद कवठेवाडी शाळा ही नियमित नाविन्यपूर्ण उपक्रम राबवत असल्याचा उल्लेख करुन शाळेचे कौतुक केले. यावेळी विद्यार्थ्यांनी शाळेला शैक्षणिक साहित्य मिळावे यासाठी महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे उपाध्यक्ष प्रा. डॉ. प्रदीप ढवळ यांच्याकडे सादर केले.
या उपक्रमाच्या अनुषंगाने क्रीडा शिक्षक डॉ. राजेश जाधव, गणपतीपुळे प्रभागाच्या शिक्षण विस्तार अधिकारी सविता तोटावार, रत्नागिरी मधील प्रसिद्ध आर्किटेक्ट संतोष तावडे यांनीही मनोगत व्यक्त करून शुभेच्छा दिल्या.
यावेळी प्रा. डॉ. प्रदीप ढवळ आणि इतर मान्यवरांच्या हस्ते वृक्षसंवर्धन करण्याच्या स्पर्धेतील विद्यार्थी व पालकांचा उत्कृष्ट वृक्षसंवर्धक म्हणून सन्मान करण्यात आला.
या उपक्रमाला पंचायत समिती रत्नागिरीचे सदस्या संजना माने, वाटद ग्रामपंचायत सरपंच अमित वाडकर, वाटद केंद्राचे केंद्रप्रमुख मीनाक्षी मोहिते, विधी व न्याय समिती सदस्य अरुण मोर्ये, लोकनेते शामराव पेजे शैक्षणिक व सामाजिक संस्थेचे अध्यक्ष संजय शितप, सामाजिक कार्यकर्ते उदय माने, राजेश सावंत, पदवीधर शिक्षक अरविंद महाकाळ यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर मंडळी उपस्थित होते.
यावर्षीच्या झाडांचे बारसे या उपक्रमासाठी ग्रामपंचायत वाटद यांनी झाडांची रोपे उपलब्ध करून देत सहकार्य केले तर या उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळा विकास समिती अध्यक्ष अप्पा धनावडे, शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्षा निकिता कुर्टे, सामाजिक कार्यकर्ते भाऊ धनावडे, शाळा विकास समितीचे उपाध्यक्ष रमेश तांबटकर, सदस्य उदय रहाटे, शिक्षणतज्ज्ञ विलास बारगुडे, मारुती कुर्टे, शाळेचे बालरक्षक विश्वनाथ शिर्के, अंगणवाडी सेविका सुजाता लोहार, यांच्यासह सर्व समितीचे सदस्य, पालक, ग्रामस्थ, आजी – माजी विद्यार्थी यांनी विशेष प्रयत्न केले.
या स्तुत्य उपक्रमाचे नियोजन शिक्षण विस्तार अधिकारी सविता तोटावार, केंद्रप्रमुख मीनाक्षी मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली शाळेचे मुख्याध्यापक माधव विश्वनाथ अंकलगे आणि सहकारी शिक्षिका पुनम कुलकर्णी यांनी केले.
सद्यस्थितीत सुरू असलेल्या वातावरणात वृक्षसंवर्धन आणि पर्यावरण संरक्षण व्हावे यासाठी शाळेने राबविलेल्या उपक्रमाचे सर्वच स्तरातून कौतुक करण्यात येत आहे.