वृद्धाचा सापाच्या भीतीने आलेल्या धक्क्याने मृत्यू
प्रवासादरम्यान घडलेल्या दुर्दैवी घटनेने परिसरात शोककळा
संगमेश्वर
करजुवे येथे एका कार्यक्रमासाठी गेलेले कोंडये येथील ६६ वर्षीय वृद्ध कार्यक्रम आटोपून परतत असताना वाटेत घडलेल्या एका अत्यंत दुर्दैवी आणि हृदयद्रावक घटनेत त्यांचा मृत्यू झाला आहे. राजाराम देवकड यांच्या गाडीने ते प्रवास करत होते. विश्राम गणपत बारगुडे वय ६६, रा. कोंडये मधलीवाडी, ता. संगमेश्वर असे मृत व्यक्तीचे नाव असून, या आकस्मिक घटनेमुळे संपूर्ण परिसरात मोठी हळहळ व्यक्त होत आहे. या प्रकरणी संगमेश्वर पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.
१ नोव्हेंबर २०२६ रोजी राजाराम देवकड यांच्या गाडीने विश्राम बारगुडे हे काही कार्यक्रमासाठी करजुवे येथे गेले होते. तेथील कार्यक्रम आटोपून ते पुन्हा कोंडये येथे परतत होते. यादरम्यान, विश्राम बारगुडे हे आपले पुतणे संदिप गोपाल बारगुडे यांच्यासह प्रवास करत होते. प्रवासादरम्यान ते दुर्गावलेवाडी परिसरात आले असता, विश्राम बारगुडे यांना नैसर्गिक विधीसाठी जाण्याची गरज भासल्याने त्यांनी गाडी थांबवण्याची विनंती केली.
गाडी थांबवल्यानंतर विश्राम बारगुडे हे खाली उतरून रस्त्याच्या बाजूला गेले असता, तिथे त्यांना अचानक एक साप दिसला. या अनपेक्षित भेटीने ते घाबरले आणि भीतीपोटी जोरात ओरडले, साप, साप त्यांचा हा आवाज ऐकून पुतण्या संदिप राजाराम देवकड यांनी तात्काळ गाडीतून खाली उतरून धाव घेतली, तोपर्यंत तो साप तिथून निघून गेला होता.
सापाच्या त्या प्रसंगातून सावरल्यानंतर तिघेही पुन्हा गाडीत बसले आणि कोंडयेच्या दिशेने मार्गस्थ झाले. मात्र, तिथून अवघ्या काही अंतर पुढे आल्यावर विश्राम बारगुडे यांना अचानक अस्वस्थ वाटू लागले. क्षणातच ते गाडीत बसलेल्या जागेवरच खाली कोसळले.
परिस्थितीचे गांभीर्य ओळखत संगमेश्वर ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र, तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी करून विश्राम बारगुडे यांना रुग्णालयात आणण्यापूर्वीच त्यांची प्राणज्योत मालवल्याचे जाहीर केले. संगमेश्वर ग्रामीण रुग्णालयात रात्रीच्या सुमारास मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले. त्यानंतर वैद्यकीय प्रक्रिया पूर्ण करून मृतदेह शोकाकुल वातावरणात अंतिम संस्कारासाठी नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.
या दुर्दैवी घटनेची खबर मृत व्यक्तीचे पुतणे संदिप गोपाल बारगुडे यांनी संगमेश्वर पोलीस ठाण्यात दिली. पोलिसांमार्फत या प्रकरणी आकस्मिक मृत्यू नुसार नोंद करण्यात आली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार अरुण. बी. वानरे करत आहेत.