मिरकरवाडा जेटी येथे दोन भावाना मारहाण
रत्नागिरी सामानाची तोडफोड करून जिवे मारण्याची धमकी
रत्नागिरी: शहरानजीकच्या मिरकरवाडा जेटी क्र. २ येथील एका पानटपरीसमोर विनाकारण जाब विचारत दोन भावांना मारहाण करून दुकानाची तोडफोड केल्याची घटना घडली आहे. या हल्ल्यात चावी कानात घुसल्याने एक तरुण गंभीर जखमी झाला असून, रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात एका संशयिताविरोधात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ३१ ऑक्टोबर रोजी मध्यरात्री १२:१० वाजण्याच्या सुमारास मिरकरवाडा जेटी क्रमांक २ येथील पानटपरीवर वसी अब्दुल रेहमान डोना (वय १९, रा. मालवणकर कंपाऊंड, चर्च रोड, रत्नागिरी) हे आपले काम करत होते. यावेळी संशयित आरोपी समद खत्री (रा. मिरकरवाडा, रत्नागिरी) हा तेथे आला. त्याने कोणत्याही कारणाशिवाय वसी डोना व त्यांचा भाऊ नफिज अब्दुल रेहमान डोना (वय २२) यांना हाताच्या थापटाने पाठीवर व मानेवर मारहाण करण्यास सुरुवात केली.
मारहाणीदरम्यान आरोपीने खिशातून चावी काढून हातात धरून नफिज यांच्या उजव्या कानावर मारली. या हल्ल्यात नफिज यांचा कान फाटून मोठ्या प्रमाणावर रक्तस्त्राव झाला. त्यानंतर आरोपीने पाण्याच्या बाटलीचे केस (क्रेट/केस) उचलून नफिज यांच्या डोक्यात मारले तसेच दुकानातील सामानाची तोडफोड करून आर्थिक नुकसान केले. “तुम्हाला घरात घुसून मारेन,” अशी धमकी देत आरोपीने घटनास्थळावरून पोबारा केला.
या घटनेत नफिज डोना व वसी डोना हे दोघेही जखमी झाले आहेत. याप्रकरणी फिर्यादी वसी डोना यांनी दिलेल्या तक्रारीवरून रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात आरोपी समद खत्री याच्याविरोधात भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम ११८(१), ११५(२), ३५२, ३५१(२) आणि ३२४(२) अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. घटनेनंतर आरोपी फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.