पाणीटंचाईच्या संकटावर मुचरीकरांची एकजूट लोकसहभागातून उभारले दोन ‘विजय बंधारे’
वरंगळ कोंड येथे जलसंधारणाचा स्तुत्य उपक्रम; ग्रामपंचायत, शिक्षक, अंगणवाडी सेविका आणि ग्रामस्तरीय पदाधिकाऱ्यांचा उत्स्फूर्त सहभाग
मुचरी : संगमेश्वर तालुक्यातील मुचरी गावात पाणीटंचाईच्या समस्येवर मात करण्यासाठी ग्रामस्थांनी एकजुटीने पुढाकार घेत लोकसहभागातून जलसंधारणाचा आदर्श निर्माण केला आहे. या कामासाठी ग्रामपंचायत अधिकारी अभिनंदन पाताडे यांनी विशेष सहकार्य आणी मार्गदर्शन केले. गावातील पाण्याची दिवसेंदिवस जाणवणारी समस्या लक्षात घेऊन वरंगळ कोंड येथे दोन ‘विजय बंधारे’ उभारण्यात आले आहेत. गावाच्या पाणीप्रश्नावर स्थानिक पातळीवर उपाय शोधण्याच्या उद्देशाने राबविण्यात आलेला हा उपक्रम निश्चितच कौतुकास्पद ठरत आहे.
पावसाळ्यात डोंगर-दऱ्यांतून आणि ओढ्यांतून वाहून जाणारे पाणी अडवून त्याचा योग्य साठा व्हावा, पाण्याचा अपव्यय टळावा आणि जमिनीत पाणी मुरण्यास मदत होऊन भूजलपातळी वाढावी, या उद्देशाने हे बंधारे उभारण्यात आले आहेत. पावसाचे पाणी अडवून ते जमिनीत जिरविणे हा भविष्यातील पाणीटंचाई कमी करण्याचा महत्त्वाचा उपाय आहे. याच विचारातून मुचरी गावात हा उपक्रम राबविण्यात आला.
पदाधिकारी, कर्मचारी आणि ग्रामस्थांची एकजूट!
या जलसंधारणाच्या कामासाठी ग्रामपंचायत, शिक्षक, अंगणवाडी सेविका, लोकप्रतिनिधी तसेच ग्रामस्तरावरील विविध पदाधिकाऱ्यांनी एकत्र येत सक्रिय सहभाग नोंदविला. यामध्ये अंगणवाडी सेविका अनुष्का मोरे, सरपंच सुवर्णा जाधव, उपसरपंच सुभाष सोलीम, तंटामुक्ती अध्यक्ष विलास वामन सुर्वे, ग्रामपंचायत सदस्य चंद्रकांत सोलीम, अनंत सुर्वे, सुरेश पडयाळ, सायली भालेकर, पोलीस पाटील विधी महाडिक आणि ग्रामसेवक अभिनंदन पाताडे यांनी पुढाकार घेतला.
गावातील पाणीटंचाई हा केवळ एका कुटुंबाचा किंवा एका वाडीचा प्रश्न नसून संपूर्ण गावाच्या दैनंदिन जीवनाशी निगडित असलेला महत्त्वाचा विषय आहे. ही जाणीव ठेवून विविध जबाबदाऱ्या सांभाळणाऱ्या व्यक्तींनी एकत्र येत जलसंधारणाच्या कामाला प्राधान्य दिले. सामूहिक प्रयत्न, सहकार्य आणि श्रमदानाच्या भावनेतून दोन बंधाऱ्यांची उभारणी करण्यात आली.
पाण्याचा प्रत्येक थेंब महत्त्वाचा!
आज बदलते हवामान, अनियमित पाऊस आणि उन्हाळ्यात जाणवणारी पाणीटंचाई यामुळे ग्रामीण भागातील पाण्याचा प्रश्न अधिक गंभीर होत आहे. अनेक गावांमध्ये पिण्याच्या पाण्यासह शेती आणि जनावरांच्या पाण्याची समस्या निर्माण होते. अशा परिस्थितीत पावसाचे पाणी अडविणे, पारंपरिक जलस्रोतांचे संवर्धन करणे, छोटे बंधारे बांधणे आणि लोकसहभागातून जलसंधारणाची कामे करणे अत्यंत आवश्यक बनले आहे.
मुचरी गावात उभारण्यात आलेले हे दोन विजय बंधारे केवळ पाणी अडविण्याचे साधन नसून गावाच्या भविष्यातील पाणी सुरक्षेच्या दृष्टीने टाकलेले महत्त्वपूर्ण पाऊल आहे. या उपक्रमामुळे जलसंधारणाबाबत ग्रामस्थांमध्ये जागरूकता निर्माण होण्यासही मदत होणार आहे.
शासनाच्या मदतीसोबत लोकसहभागाचीही गरज!
गावाच्या विकासासाठी प्रत्येक वेळी शासनाच्या योजनांची वाट पाहण्यापेक्षा उपलब्ध साधनसंपत्तीचा योग्य वापर करून ग्रामस्थांनी स्वतः पुढाकार घेणे गरजेचे आहे. ग्रामपंचायत, स्थानिक पदाधिकारी, कर्मचारी आणि ग्रामस्थ यांनी एकत्रितपणे काम केल्यास गावातील अनेक मूलभूत प्रश्नांवर स्थानिक पातळीवर उपाय शोधता येऊ शकतात, हे मुचरीतील या उपक्रमातून दिसून येते.
गावाच्या हितासाठी सर्वांनी एकत्र येऊन केलेले हे कार्य सामाजिक एकोपा, गावाप्रती असलेली बांधिलकी आणि सामूहिक जबाबदारीचे उत्तम उदाहरण आहे. अशा उपक्रमांना सातत्य मिळाल्यास गावातील जलस्रोतांचे संवर्धन होण्यास आणि भविष्यातील पाणीटंचाईची तीव्रता कमी करण्यास मदत होऊ शकते.
‘थेंब थेंब साठवूया, पाणीटंचाईवर मात करूया; गावाच्या विकासासाठी एकत्र येऊया!’ हा संदेश देणारे मुचरीतील दोन विजय बंधारे ग्रामस्थांच्या एकजुटीचे प्रतीक ठरत आहेत. गावाच्या पाणीप्रश्नासाठी पुढाकार घेणाऱ्या सर्व पदाधिकारी, कर्मचारी आणि ग्रामस्थांचे या स्तुत्य कार्याबद्दल अभिनंदन होत आहे.
लोकसहभागातून जलसंधारण आणि एकजुटीतून गावाचा विकास, हाच मुचरीकरांचा प्रेरणादायी संकल्प!