जल साक्षरतेतील योगदानाची दखल! फैयाज मुकादम यांना ‘जलसेवा गौरव पुरस्कार’
रत्नागिरी : रत्नागिरी जिल्हा जल साक्षरता अभियान रत्नागिरी पर्यटन सहकारी सेवा संस्था मर्यादित, हिरवळ प्रतिष्ठान व जिल्हा प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमाने रत्नागिरीत जलसेवा गौरव पुरस्कार वितरण सोहळा संपन्न झाला. भविष्यातील पाणीटंचाईची संभाव्य समस्या लक्षात घेऊन उपलब्ध जलस्रोतांचे संवर्धन, पाण्याचा काटकसरीने वापर आणि प्रभावी पाणी नियोजन याबाबत जनजागृती करण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेली ‘रत्नागिरी जिल्हा शाश्वत पाणी परिषद’ अत्यंत उत्साहात पार पडली. या परिषदेला आमदार प्रमोद जठार यांची प्रमुख उपस्थिती होती.
या कार्यक्रमात रत्नागिरी जिल्ह्यातील मजगाव येथील माजी सरपंच फैयाज मुकादम यांना जलसंवर्धन, जलसंधारण आणि जलजागृती या क्षेत्रात केलेल्या त्यांच्या उल्लेखनीय सामाजिक योगदानाबद्दल मानाचा ‘जलसेवा गौरव पुरस्कार’ प्रदान करून सन्मानित करण्यात आले. २९ ऑक्टोबर २०२६ रोजी रत्नागिरी येथे झालेल्या या कार्यक्रमात त्यांचे कार्य समाजासाठी प्रेरणादायी ठरो आणि जलसंवर्धनाची चळवळ अधिक व्यापक होवो, अशा सदिच्छा व्यक्त करण्यात आल्या.
या सोहळ्यात व्यासपीठावर आमदार प्रमोद जठार यांच्यासह पर्यटन संस्थेचे अध्यक्ष राजू भाटलेकर, प्रांताधिकारी जीवन देसाई, पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता विजय पाटील, मृद जलसंधार विभागाचे कार्यकारी अभियंता धनंजय साहुले, जिल्हा कृषी अधिकारी शिवकुमार सदाफुले, तहसीलदार राजाराम म्हात्रे, डॉ. श्रीधर ठाकुरदेसाई, दादा दळी आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय वैशंपायन यांनी केले तर प्रास्ताविक नंदू तांबे यांनी केले.