रत्नागिरीच्या बाजारात तब्बल चार महिने आधीच आला ‘हापूस’!; आंब्याच्या पहिल्या पेटीला मिळाला तब्बल २१ हजारांचा दर
गावखडीतील दत्ताराम पडयार यांच्या बागेतील आंब्याची पहिली पेटी सतीश पवार बंधूंकडे दाखल ; कौस्तुभ दीक्षित ठरले मानकरी
रत्नागिरी:- रत्नागिरीच्या हापूस आंब्याने यंदा सर्वच आंबेप्रेमींना आश्चर्याचा धक्का दिला आहे. सामान्यतः फेब्रुवारी महिन्यापासून मार्केटमध्ये हापूस आंब्याची आवक सुरू होत असते; परंतु यावर्षी हवामानातील बदलांमुळे तब्बल चार महिने अगोदरच हापूस आंबा रत्नागिरी बाजारपेठेत दाखल झाला आहे.
रत्नागिरी जवळील गावखडी पडयारवाडी येथे आंबा व्यावसायिक दत्ताराम दाजी पडयार यांच्या बागेतील आंब्याची ४ डझनची एक पेटी रत्नागिरी बाजारपेठेतील ‘सतीश पवार बंधू’ यांच्याकडे विक्रीसाठी आली. या हंगामापूर्वीच्या मान्सूनपूर्व आंब्याच्या एका पेटीचा दर तब्बल २१ हजार रुपये इतका लागला असून, त्यानुसार या आंब्याचा ६ हजार रुपये प्रति डझनचा दर ठरला आहे.
या आगळ्यावेगळ्या आणि बहुचर्चित आंब्याचे पहिले ग्राहक म्हणून कौस्तुभ दीक्षित हे मानकरी ठरले आहेत. एरवी फेब्रुवारीत येणारा हापूस यंदा ऑक्टोबर-नोव्हेंबरच्या सुमारास बाजारपेठेत आल्याने रत्नागिरीत मोठी चर्चा रंगली आहे.