‘स्वतंत्र कोकणराज्य अभियाना’च्या वेबसाईटचे ३० ऑक्टोबरला उद्घाटन
उद्योगपती आणि पत्रकारांच्या उपस्थितीत ‘कोकणरत्न’ पुरस्कार प्रदान सोहळा
मुंबई:
कोकणच्या सर्वांगीण विकासासाठी आणि स्वतंत्र ओळखीसाठी कार्यरत असलेल्या ‘स्वतंत्र कोकणराज्य अभियाना’च्या वतीने एका विशेष सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात अभियानाच्या अधिकृत वेबसाईटचे उद्घाटन तसेच विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांना ‘कोकणरत्न’ पदवी प्रदान करून सन्मानित करण्यात येणार आहे. हा भव्य सोहळा येत्या शुक्रवारी, ३० ऑक्टोबर २०२६ रोजी दुपारी ४:०० वाजता मुंबई मराठी पत्रकार भवन (आझाद मैदाना शेजारी, सीएसटी पश्चिम, मुंबई) येथे पार पडणार आहे.
‘स्वतंत्र कोकणराज्य अभियाना’चे संस्थापक श्री. संजय कोकरे या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असणार आहेत. कोकणातील पर्यटन, संस्कृती, रोजगार आणि स्थानिक समस्यांना डिजिटल माध्यमातून अधिक गती देण्यासाठी ही नवी वेबसाईट तयार करण्यात आली असून, अभियानाचे सल्लागार आणि वरिष्ठ पत्रकार श्री. सचिन कळझुनकर यांच्या हस्ते या वेबसाईटचे रीतसर उद्घाटन केले जाणार आहे.
तसेच, या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून नामवंत उद्योजक श्री. लायनल वेलोज उपस्थित राहून उपस्थितांना मार्गदर्शन करतील. कार्यक्रमाचे औचित्य साधून कोकणच्या समृद्धीसाठी व चळवळीसाठी योगदान देणाऱ्या घटकांना ‘कोकणरत्न’ पुरस्काराने भूषवले जाईल. या संपूर्ण सोहळ्याचे नेटके आणि बहारदार सूत्रसंचालन कोकणरत्न श्री. रूपेश कदम करणार आहेत.
स्वतंत्र कोकणराज्याची संकल्पना अधिक लोकांपर्यंत पोहोचवणे आणि डिजिटल युगात कोकणातील प्रश्नांना वाचा फोडणे हा या वेबसाईटच्या उद्घाटनामागील मुख्य उद्देश आहे. या महत्त्वपूर्ण सोहळ्याला सर्व नागरिक, कोकणप्रेमी आणि प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन स्वतंत्र कोकणराज्य अभियान (कार्यालय: घाटकोपर पश्चिम, मुंबई, मोबाईल: ९२२४४४३११९) यांच्या वतीने करण्यात आले आहे.