भाजपला पराभव दिसू लागल्यानेच मतदारांची नावे वगळली जात आहेत : सौम्या रेड्डी
रत्नागिरी : जे देशात होत आहे, ती फक्त वोट चोरी नाही, तर आमचा हक्क हिरावून घेण्याचा प्रयत्न आहे आणि हा प्रयत्न भाजप करत आहे, असा थेट हल्लाबोल एआयसीसी निरीक्षक सौम्या रेड्डी यांनी रत्नागिरीत केला.
‘वोट बचाओ देश बचाओ’ अभियानांतर्गत आज रत्नागिरी शहरातील जिल्हा काँग्रेस कार्यालयात उत्तर व दक्षिण रत्नागिरीची संयुक्त पत्रकार परिषद पार पडली. यावेळी त्या बोलत होत्या.
सौम्या रेड्डी म्हणाल्या, गेल्या बारा वर्षांत भाजपने सर्वसामान्यांना काहीच दिले नाही. अच्छे दिन आएंगे म्हणाले होते, पण अच्छे दिन आले असतील तर फक्त अदानी-अंबानींना आले, आम आदमीला आले नाहीत.
निवडणूक आयोगावरही त्यांनी प्रश्न उपस्थित केला. आयोगाने प्रत्येक निवडणूक फ्री अँड फेअर घ्यायला पाहिजे, पण सध्या काय होतेय ते आपण पाहतोय, असे त्या म्हणाल्या.
सर्वात गंभीर आरोप करताना त्या म्हणाल्या, भाजपला कळून चुकले आहे की धर्म-जातीच्या नावावर जिंकता येणार नाही. म्हणून जे मतदार आपल्याला मतदान करणार नाहीत. खासकरून दलित, अल्पसंख्याक, महिला, आदिवासी त्यांचीच नावे मतदार यादीतून वगळली जात आहेत.
सौम्या रेड्डी या बंगळुरूच्या जयदेव मतदारसंघाच्या माजी आमदार असून ५ जिल्ह्यांसाठी एआयसीसी ऑब्झर्व्हर म्हणून त्यांची नियुक्ती आहे. यावेळी काँग्रेसच्या प्रदेश सरचिटणीस ॲड. हुस्नबानू खलिफे, दक्षिण रत्नागिरी जिल्हाध्यक्ष जमीर खलिफे, रत्नागिरी जिल्हाध्यक्षा सोनललक्ष्मी घाग व दक्षिणचे पदाधिकारी उपस्थित होते