वाटद येथे दुचाकी घसरून अपघात; दुचाकीस्वाराविरोधात गुन्हा दाखल
रत्नागिरी: तालुक्यातील वाटद मिरवणे फाटा येथील धोकादायक वळणावर रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून भरधाव वेगाने दुचाकी चालवत स्वतःच्या व इतरांच्या जिवास धोका निर्माण करणाऱ्या एका दुचाकीस्वाराविरोधात जयगड सागरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, संशयित आरोपी सलाऊद्दीन इद्रीस समानी (वय २५ वर्षे, व्यवसाय भंगार गोळा करणे, रा. रिंगी फाटा, रत्नागिरी) हा आपल्या ताब्यातील मोटार सायकल (क्रमांक एमएच ०८ एल ८७५२) घेऊन खंडाळा येथून मिरवणे गावाच्या दिशेने जात होता. दुपारी पावणेएक वाजण्याच्या सुमारास तो वाटद मिरवणे फाटा येथील तीव्र वळणावर आला असता, त्याने रस्त्याची स्थिती व वाहतुकीच्या नियमांकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले. भरधाव आणि हयगयीने दुचाकी चालवून ती रस्त्याच्या साईडपट्टीवरून खाली उतरवल्याने गाडी थेट रस्त्यावर स्लिप झाली.
या बेदरकार वाहन चालवण्याच्या प्रकाराची दखल घेत जयगड सागरी पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार संतोष विजय शिंदे (वय ५०) यांनी स्वतः सरकारतर्फे फिर्याद दिली. या फिर्यादीवरून जयगड पोलिसांनी संशयित आरोपी सलाऊद्दीन समानी याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम २८१ अन्वये हयगयीने वाहन चालवल्याप्रकरणी गुन्हा नोंदवला असून, या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहेत.