संस्थामाता सुशीलादेवी साळुंखे यांना पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन!
श्री छ. शिवाजी हायस्कूल, झाडगाव येथे स्मृतिदिन साजरा
रत्नागिरी , दि. २२ ऑक्टोबर : श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था, कोल्हापूर संचलित श्री छ. शिवाजी हायस्कूल, झाडगाव – रत्नागिरी येथे संस्थामाता सुशीलादेवी साळुंखे यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या पवित्र स्मृतींना विनम्र अभिवादन करण्यात आले.
यावेळी शाळेचे ज्येष्ठ शिक्षक श्री ए. डी. सुतार सर यांच्या हस्ते संस्थामातांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. श्री एन. व्ही. जाधव सर यांनी संस्थामाता सुशीलादेवी साळुंखे यांच्या जीवनकार्याला उजाळा देत त्यांच्या त्याग, समर्पण आणि शिक्षणसेवेचा गौरव केला.
संस्थामाता सुशीलादेवी साळुंखे या श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या जडणघडणीत मोलाचे योगदान देणारे एक आदरणीय व्यक्तिमत्त्व होते. शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे यांच्या शैक्षणिक कार्याला खंबीर साथ देत त्यांनी संस्थेच्या विकासासाठी आपले आयुष्य समर्पित केले. त्यांचे जीवन म्हणजे त्याग, प्रेम, मातृत्व, सेवाभाव आणि शिक्षणनिष्ठेचा एक आदर्श वस्तुपाठ आहे.
शिक्षणाच्या माध्यमातून समाजाची उन्नती साधण्याचे ध्येय उराशी बाळगून कार्य करणाऱ्या या मातृशक्तीने संस्थेतील विद्यार्थी, शिक्षक आणि गुरुदेव कार्यकर्त्यांना मायेची ऊब व प्रेरणेचे बळ दिले. संस्थेच्या प्रगतीमध्ये त्यांचे योगदान अनमोल असून, त्यांनी जपलेली मूल्ये आजही संस्थेच्या शैक्षणिक वाटचालीला दिशादर्शक ठरत आहेत.
“महान कार्य उभे करण्यासाठी केवळ स्वप्ने पाहून चालत नाही, तर त्या स्वप्नांच्या पूर्ततेसाठी त्याग, समर्पण, प्रेम आणि अथक परिश्रमांची जोड द्यावी लागते,” हा संस्थामातांच्या जीवनकार्यातून मिळणारा मोलाचा संदेश असल्याचे श्री जाधव यांनी आपल्या मनोगतातून अधोरेखित केले.
संस्थामाता सुशीलादेवी साळुंखे यांचे कार्य आणि विचार हे संस्थेच्या प्रत्येक ज्ञानमंदिरात, विद्यार्थ्यांच्या प्रगतीत आणि शिक्षकांच्या सेवाभावात सदैव प्रेरणा देत राहतील, अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.
त्यागमूर्ती, प्रेममूर्ती आणि शिक्षणसेवेच्या प्रेरणास्रोत असलेल्या संस्थामाता सौ. सुशीलादेवी साळुंखे यांच्या पवित्र स्मृतींना शाळेच्या वतीने भावपूर्ण अभिवादन करण्यात आले.
या कार्यक्रमाला शाळेच्या शिक्षिका सौ. जी. पी. शितूत मॅडम, श्रीमती करंबेळकर मॅडम, श्री सावंत सर, श्री सनगरे सर, श्री फगरे मामा तसेच सर्व विद्यार्थी उपस्थित होते.