दुष्काळग्रस्त भागांतील विद्यार्थ्यांना दिलासा
गोगटे- जोगळेकर महाविद्यालयाकडून परीक्षा शुल्क परताव्याची सुरुवात
रत्नागिरी : दुष्काळाच्या संकटाचा सामना करणाऱ्या ग्रामीण व दुष्काळग्रस्त भागांतील विद्यार्थ्यांना मोठा आर्थिक दिलासा देत मुंबई विद्यापीठाच्या निर्देशानुसार परीक्षा शुल्क परतावा देण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. या उपक्रमात पुढाकार घेत रत्नागिरीतील नामांकित गोगटे- जोगळेकर (स्वायत्त) महाविद्यालयाने पात्र विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क परत करण्याची प्रत्यक्ष कार्यवाही सुरू केली आहे, अशी माहिती प्राचार्य डॉ. मकरंद साखळकर यांनी दिली.
दुष्काळग्रस्त परिस्थितीमुळे शेतकरी व ग्रामीण भागांतील पालकांचे आर्थिक गणित कोलमडले असून, मुलांच्या शिक्षणाचा खर्च भागवणे कठीण झाले होते. या पार्श्वभूमीवर राज्य शासन आणि मुंबई विद्यापीठाने दुष्काळग्रस्त जाहीर झालेल्या भागांतील विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ करून ते परत करण्याचा निर्णय घेतला होता.
विद्यापीठाच्या या निर्णयाची तात्काळ अंमलबजावणी करत, रत्नागिरीतील गोगटे जोगळेकर महाविद्यालयाने पात्र विद्यार्थ्यांची यादी तयार करून त्यांच्या अर्ज प्रक्रियेची छाननी केली. सर्व पडताळणी पूर्ण झाल्यानंतर आता विद्यार्थ्यांना हाती रक्कम देण्यास सुरुवात केली आहे. महाविद्यालयाच्या या जलद आणि पारदर्शक कार्यवाहीमुळे विद्यार्थी व पालकांमधून समाधान व्यक्त केले जात आहे.
विद्यार्थी व पालकांना मोठा आधार
परीक्षा शुल्क परताव्याची रक्कम विद्यार्थ्यांच्या प्रत्यक्ष हातात दिली जात आहे. त्यासाठी कोणताही अर्ज भरावा लागत नाही. यामुळे विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी व दैनंदिन खर्चासाठी मोठा आर्थिक आधार मिळाला आहे. “रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीने व गोगटे जोगळेकर महाविद्यालयाने ऐन गरजेच्या वेळी दाखवलेल्या या संवेदनशीलतेमुळे दुष्काळातही शिक्षणाचा मार्ग सुकर झाला आहे,” अशी प्रतिक्रिया लाभार्थी विद्यार्थ्यांनी दिली आहे.