रत्नागिरी शहरातील सांभाव्य पाणीसंकट टळणार
शीळ आणि पानवल धरणांच्या कामांना वेग
रत्नागिरी : शहरावर यंदा ओढवणारे संभाव्य पाणीटंचाईचे संकट वेळीच रोखण्यासाठी आणि नागरिकांना नियमित पाणीपुरवठा करण्यासाठी स्थानिक प्रशासनाकडून तातडीच्या उपाययोजना राबवल्या जात आहेत. पावसाचे अल्प झालेले प्रमाण आणि वाढत्या उन्हामुळे निर्माण होणार्या समस्येवर मात करण्यासाठी धरण प्रकल्पांची प्रलंबित कामे वेगाने पूर्ण करण्यावर विशेष भर दिला जात आहे.
यावर तोडगा म्हणून पानवल आणि शीळ धरणांमधील उपलब्ध पाणी साठा प्रभावीपणे वापरण्याचे नियोजन आखण्यात आले आहे. या संदर्भात पाणीपुरवठा समिती सभापती निमेष नायर यांनी दिलेल्या माहितीच्या आधारे विविध कामांच्या निधीला संमती देण्याची प्रक्रिया चालू झाली आहे. पानवल आणि शीळ या दोन्ही प्रकल्पांची कामे पूर्ण होताच रत्नागिरी शहराचा पाणीपुरवठा पुन्हा पूर्ववत् आणि सुरळीत होणार आहे.
यंदा जिल्ह्यात पाऊस अवघे ८५ दिवसच पडल्याने धरणातील साठ्याचे वेगाने बाष्पीभवन होत आहे, ज्यामुळे टंचाईचा धोका वाढला आहे. यामुळे पाणीपुरवठ्याशी निगडित अनेक प्रकल्पांना संमती देण्याची प्रक्रिया चालू आहे. नळपाणी योजनेचे कंत्राट घेतलेल्या आस्थापनाचे थकीत ७५ लाख रुपयांचे देयक अदा करण्यास जिल्हाधिकार्यांकडून प्रशासकीय संमती मिळाली आहे. या निधीमुळे पानवल धरणापासून नाचणे जलशुद्धीकरण केंद्रापर्यंतची १ सहस्र ३०० मीटर लांबीची अपूर्ण जलवाहिनी बांधण्याचे काम मार्गी लागणार आहे. यासह नाचणे तलावातील साचलेला गाळ काढून ते पाणी शुद्धीकरण केंद्रापर्यंत आणण्यासाठी नवीन वाहिनी उभारण्यात येणार आहे. शीळ धरणावरील जुनी आणि बुजलेली जॅकवेल पूर्णपणे साफ करून तिची पुनर्बांधणी करण्याचे नियोजन हाती घेण्यात आले आहे. सध्या खबरदारीचा उपाय म्हणून प्रत्येक सोमवारी पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येत असला, तरी ही कामे पूर्ण झाल्यावर पाणीप्रश्न कायमचा सुटेल.
रत्नागिरी जिल्ह्यात जलसंकटावर मात करण्यासाठी लोकसहभागातून जलसंधारणाच्या कामांना प्रचंड वेग आला असून प्रशासनाने ६ सहस्र ५०१ बंधारे उभारून ५ वर्षांतील उच्चांक गाठला आहे. जिल्ह्यातील ८४७ ग्रामपंचायतींना १२ सहस्र ७०५ बंधारे बांधण्याचे उद्दिष्ट दिले असून १६ ऑक्टोबर या दिवशी राबवलेल्या महामोहिमेत २ सहस्र ५२५ कच्चे, तर २ सहस्र ८०७ विजय बंधारे आणि १,१७६ वनराई बंधारे उभारण्यात आले.