शिरगाव येथे पिकअपची एसटीला जोरदार धडक
दोन्ही वाहनांचे नुकसान, चिपळूण पोलिसांत गुन्हा
चिपळूण: चिपळूण ते कराड मार्गावर एसटी बस आणि पिकअप टेंपोची धडक होऊन अपघात झाल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी चिपळूण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा अपघात १८ ऑक्टोबर रोजी पहाटे सव्वाएक वाजेच्या सुमारास चिपळूण ते कराड जाणारे रोडवर, शिरगाव बौद्धवाडी येथे घडला. फिर्यादी प्रविण उत्तम गायकवाड (वय ३६, रा. रोकडी, हातकणगले, जि. कोल्हापूर) हे एसटी बस (क्र. एमएच १४ बीटी ४६३३) चालवून दापोली ते मिरज अशी जात होते.
शिरगाव बौद्धवाडीजवळ आले असता, समोरून येणारा पिकअप टेंपोचा (क्र. एमएच १२ एसएक्स ३५०९) चालक अक्षय हौसेराव सूर्यवंशी (वय २९, रा. भोळेवाडी, बेलदरे, ता. कराड, जि. सातारा) याने आपली गाडी भरधाव वेगात, हलगर्जीपणे आणि रॉंग साईडने चालवून एसटी बसच्या ड्रायव्हर बाजूला धडक दिली. या अपघातात एसटी बस आणि पिकअप टेंपोचे नुकसान झाले आहे.
या प्रकरणी एसटी चालक प्रविण गायकवाड यांनी फिर्याद दिली असून, त्यावरून चिपळूण पोलीस ठाण्यात भारतीय न्यायसंहितेच्या संबंधित कलमांन्वये आणि मोटार वाहन कायद्यानुसार गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास सुरू आहे.