महायुती सरकार शेतकऱ्यांच्या भक्कमपणे पाठीशी
आ. निलेश राणे; गावोगावी वनराई बंधारे बांधून पाणी अडवूया
राजापूर: कमी प्रमाणात झालेल्या पावसामुळे राज्यात दुष्काळाचे संकट ओढवले आहे, या दुष्काळाच्या संकटात कोकणातील काही तालुकेही ट्रीगर एक मध्ये आहेत. त्यामुळे राज्यावर आणि कोकणावर ओढवलेले हे दुष्काळाचे संकट दूर कर, यातुन सावरण्याची शक्ती दे अशी प्रार्थना आदीमातेकडे करत दुष्काळ निवारणासाठी गावागावात वनराई बंधारे बांधून पाणी साठवूया व एकसंघपणे दुष्काळवर मात करूया असे आवाहन कुडाळ मालवण विधानसभेचे आमदार निलेश राणे यांनी केले आहे.
शुक्रवारी राजापूर दौऱ्यावर आलेल्या आ. राणे यांनी राजापुरात पत्रकारांशी संवाद साधला. आपण रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघाचे खासदार म्हणून प्रतिनिधीत्व करत असल्यापासून दरवर्षी गणेशोत्सव व नवरात्र उत्सवात राजापुरात येतो, काही मंडळांच्या नवरात्र उत्सवाला भेट देतो व प्रसिध्द आडिवरेच्या श्री महाकाली देवीचे दर्शन घेतो. आज त्यासाठीच आपण राजापुरात आलो असून राज्यावर ओढवलेले हे दुष्काळाचे संकट दूर कर असे साकडं आपण देवीला घातल्याचे आ. राणे यांनी सांगितले. राज्यात ७५ टक्के दुष्काळ असून कोकणातील काही तालुकेही ट्रीगर एक मध्ये समाविष्ट आहेत. त्यामुळे आपल्याला सगळयांना या दुष्काळाचा सामना हा एकसंघटपणे करायचा आहे. हे दुष्काळाचे संकट दूर कर, या दुष्काळातुन सावरण्याची शक्ती जनतेला हे हीच आपली देवीकडे प्रार्थना असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
राज्यातील या दुष्काळ निवारणासाठी शासन आपल्या पध्दतीने काम करत आहे. सरकारची मदत ही टप्प्या टप्प्याने मिळणार आहेच. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सुनेत्रा पवार यांनी अनेक चांगले निर्णय घेतले आहेत. शेतकऱ्यांना आर्थिक मदतही जाहिर केली आहे. मात्र भविष्यात जास्तीत जास्त आर्थिक मदत शासनाकडून कशी मिळेल, एकही शेतकरी नुकसान भरपाई पासून वंचित रहाणार नाही यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचेही आ. राणे यांनी यावेळी सांगितले.
या दुष्काळाच्या परिस्थितीवर मात करण्यासाठी आपल्याला गावागावात वनराई बंधारे बांधावे लागणार आहेत, पाणी अडवावे लागणार आहेत. त्यासाठी शासन नियोजन करत आहेच पण विविध संस्थांसह आपणालाही सगळयांना पुढाकार घेऊन यासाठी काम करावे लागेल, पाणी साठवावे लागेल हे लक्षात घेऊन सगळयांनी काम करा असे आवाहनही आ. राणे यांनी यावेळी केले. या दुष्काळी परिस्थितीत चांगले काम करून हे दुष्काळाचे संकट राज्यातुन आणि कोकणातुन कायमस्वरूपी दूर करूया असे आवाहनही आ. राणे यांनी यावेळी केले.