बोरघर येथे कारची जेसीबीला जोरदार धडक; युवक जखमी
खेड : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील बोरघर (ता. खेड) हद्दीत गुरुवारी दुपारी भीषण अपघात घडला. महामार्गावर दुभाजकाच्या कामात गुंतलेल्या एका जेसीबीला भरधाव अर्टिगा कारने पाठीमागून जोरदार धडक दिली. या अपघातात कारमधील सौरभ भागोजी टोणे (वय २२, रा. कवठे महांकाळ, जि. सांगली) हा युवक गंभीर जखमी झाला असून त्याला उपचारासाठी तातडीने कळंबणी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेमुळे महामार्गावरील कामाच्या ठिकाणी असलेल्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
प्राथमिक माहितीनुसार, महामार्गावरील बोरघर परिसरामध्ये दुभाजकाच्या मध्यभागी झाडे लावण्यासाठी खड्डे खोदण्याचे काम सुरू होते. यासाठी एक जेसीबी मशीन रस्त्यावर कार्यरत होती. दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास मुंबईहून चिपळूणच्या दिशेने जाणारी एमएच ०३ एफडी २४५२ क्रमांकाची अर्टिगा कार बोरघरनजीक आली असता चालकाचे नियंत्रण सुटले आणि कार थेट कामावर असलेल्या जेसीबीवर आदळली. ही धडक इतकी जोरदार होती की कारच्या पुढील भागाचा अक्षरशः चक्काचूर झाला. मूळचा सांगली जिल्ह्यातील असलेला सौरभ टोणे हा पाटणच्या दिशेने प्रवास करत असताना हा अपघात घडला.
दरम्यान, भरधाव वाहतूक सुरू असणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावर दिवसाढवळ्या काम सुरू असताना संबंधित यंत्रणेकडून पुरेशी दक्षता घेतली गेली होती का, याबाबत तीव्र शंका उपस्थित होत आहेत. कामाच्या ठिकाणी वाहनचालकांना लांबून दिसावेत असे दिशादर्शक फलक, रिफ्लेक्टर्स, सुरक्षित अंतरावर बॅरिकेड्स किंवा वाहतूक नियमनासाठी सुरक्षा कर्मचारी तैनात करण्यात आले होते का, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. वेगवान महामार्गावर पूर्वसूचनेचा अभाव अशा अपघातांना निमंत्रण देणारा ठरत असल्याचे या घटनेने पुन्हा सिद्ध केले आहे.
सुदैवाने या भीषण अपघातात मोठी जीवितहानी टळली असली, तरी कारचे अतोनात नुकसान झाले आहे. अपघाताची नेमकी कारणे, वाहनाचा वेग आणि कामाच्या ठिकाणी असलेल्या अधिकृत सुरक्षा व्यवस्थांची पडताळणी संबंधित यंत्रणा आणि पोलिसांच्या तपासानंतरच स्पष्ट होणार आहे. महामार्गावर सुरू असलेल्या विकासकामांच्या ठिकाणी प्रवाशांच्या जीविताशी खेळ न करता तातडीने कडक सुरक्षा उपाययोजना राबवण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे.