हर्णे समुद्रात आढळला खलाशाचा मृतदेह
दापोली तालुक्यातील घटना
दापोली (वार्ताहर): हर्णे (ता. दापोली) येथील सुवर्णदुर्ग किल्ल्याच्या बाजूला समुद्राच्या पाण्यात एका खलाशाचा मृतदेह तरंगताना आढळल्याची दुर्देवी घटना समोर आली आहे. याप्रकरणी हर्णे पोलीस ठाण्यात बी.एन.एस.एस. कलम १९४ अन्वये आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मयत रोहीदास यशवंत धरणकर आणि महेश पोशा चोलकर हे दोघे जेवण करून रात्री बोटीवर झोपले होते. त्यानंतर २ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास महेश चोलकर यांनी परशुराम बाळ्या चोगले यांना फोन करून, “रोहीदास धरणकर हे बोटीवर दिसत नाहीत,” अशी माहिती दिली.
या माहितीनंतर परशुराम चोगले यांनी तातडीने अडखळ खाडी येथील बोट गाठून रोहीदास यांचा बोटीवर व खाडीकिनारी शोध घेतला, परंतु ते सापडले नाहीत. त्यानंतर त्यांच्या गाकडील नातेवाईकांशी संपर्क साधून ते गावी श्रीवर्धन येथे गेले आहेत का, याची चौकशी केली असता ते तिथेही गेले नसल्याचे स्पष्ट झाले.
यामुळे खबर देणार, बोटीवरील इतर खलाशी व ग्रामस्थांनी मिळून अडखळ-अंजर्ले खाडी परिसर तसेच सुवर्णदुर्ग किल्ल्याच्या आसपासच्या समुद्रात कसून शोध घेतला. यादरम्यान, ४ ऑक्टोबर रोजी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास सुवर्णदुर्ग किल्ल्याच्या बाजूला समुद्रात रोहीदास धरणकर यांचा मृतदेह पाण्यावर तरंगताना आढळून आला.
पोलिसांनी या प्रकरणी आवश्यक ती कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केली असून, पुढील तपास सुरू आहे.