जिल्ह्यात १० वर्षांतील निचांकी पावसाची नोंद
रत्नागिरी: यावर्षी पावसाळ्याच्या चारही महिन्यात पावसाने निराशा केली आहे. यावर्षी हवामानाचे सर्व अंदाज बगल देत ‘एल निनो’चा प्रभाव कायम राहिला आहे. वार्षिक सरासरी केवळ २,४३७ मि.मी. (७२.४४ टक्के) इतकी गाठत पावसाने परतीचा प्रवास सुरू केला आहे. मात्र, यावर्षीचा पाऊस गेल्या दहा वर्षांतील सर्वात निचांकी पाऊस ठरला आहे. त्यामुळे आगामी काळात पिकांच्या नुकसानाबरोबरच पाणीटंचाईच्या तीव्र संकटाला सामोरे जावे लागणार आहे.
गतवर्षी ९० टक्के पाऊस पडला होता. यंदाही ९० टक्के पावसाचा अंदाज हवामान खात्याकडून पावसाळ्याच्या आधी सहा महिने वर्तविण्यात आला होता. मात्र, सुरुवातीपासून ‘एल निनो’चा प्रभाव जाणवू लागला. गेल्या वर्षी मे महिन्यात पडलेल्या मान्सूनपूर्व पावसाने पाणीटंचाईच्या संकटाचा सामना करण्यासाठी हात दिला होता. मात्र, यंदा मान्सूनपूर्व पावसानेही पाठ फिरवली. यंदा पावसाच्या अवकृपेमुळे रोहिणी बरसल्याच नाहीत, पण मृगही कोरडाच गेला. जून, जुलै महिन्याने निराशा केली असली तरी सप्टेंबर, ऑक्टोबर महिन्यात पाऊस तूट भरून काढेल, अशी आशा होती. पण यंदा पावसाची तूट जून ते सप्टेंबर या चारही महिन्यांमध्ये कायम राहिली. जुलै ते सप्टेंबर या चार महिन्यांच्या कालावधीत मुसळधार पावसाचे सर्वच अंदाज प्रत्येकवेळी फोल ठरले. यंदा काही दिवस सलग मुसळधार पावसाचा अनुभव जिल्हावासीयांना मिळाला नाही. जुलै महिन्याच्या सरासरीच्या ९० टक्के पडलेला पाऊस वगळता पावसाच्या उर्वरित तीन महिन्यांच्या वार्षिक सरासरीच्या ६४ ते ६६ टक्के इतका पाऊस पडला आहे. एवढेच नव्हे तर चारही महिन्यात त्या-त्या महिन्याची सरासरी पावसाने ओलांडली नाही, असेही यावर्षी घडले आहे.