शैक्षणिक सामाजिक कार्यकर्ते संजय शितप यांना ‘रत्नागिरी जिल्हास्तरीय आदर्श विद्यारत्न’ पुरस्कार
मागील अनेक वर्षांपासून आरोग्यासह विविध क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल
खंडाळा : शिक्षण क्षेत्रातील योगदानासोबतच आरोग्यविषयक जनजागृती, सामाजिक बांधिलकी आणि समाजोपयोगी विविध उपक्रमांमध्ये सक्रिय सहभागी असणारे लोकनेते शामराव पेजे सामाजिक व शैक्षणिक विकास संस्थेचे अध्यक्ष, रत्नागिरी जिल्ह्यातील कळझोंडी गावचे सुपुत्र आणि निःस्वार्थी सामाजिक कार्यकर्ते श्री. संजय गोपाळ तथा पांडुशेठ शितप यांनी सातत्याने केलेल्या कार्याची दखल घेऊन खेड जि. रत्नागिरी येथील गणेश सभागृहात रिजनल टीचर्स ऑर्गनायझेशन दापोली आणि पर्यटन व्यावसायिक महासंघ कोकण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने रत्नागिरी जिल्हास्तरीय आदर्श विद्यारत्न पुरस्कार २०२६ प्रसिद्ध व्याख्याते माननीय प्राचार्य डॉ. प्रशांत कुलकर्णी सर, संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री. काशीद सर, यांच्या हस्ते आणि राज्याध्यक्ष बेर्डे सर जिल्हाध्यक्ष विपुल देसाई, रत्नागिरी तालुकाध्यक्ष शिरीष लिंगायत यांच्या प्रमुख उपस्थितीत देऊन गौरविण्यात आले.
संजय शितप यांनी मागील अनेक वर्षे खंडाळा परिसरासह संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्यात लोकनेते शामराव पेजे सामाजिक व शैक्षणिक विकास संस्था आणि या संस्थेसह विविध संस्थांच्या माध्यमातून सातत्याने वैविध्यपूर्ण उपक्रम राबविण्यासाठी पुढाकार घेत, ग्रामीण भागातील सर्वसामान्य लोकांना आरोग्य सेवा पुरविण्यासाठी कार्य केले आहे. कोविड – १९ काळात त्यांनी खंडाळा परिसरात मोठ्या प्रमाणात आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न केले आहेत. तसेच सातत्याने आरोग्य तपासणी शिबीरे, रक्त तपासणी शिबीरे, नेत्र तपासणी शिबीरे यासह विविध माध्यमातून लोकांची सेवा करण्यासाठी ते तत्पर असतात.
रत्नागिरी जिल्ह्यातील खंडाळा भागात सर्वसामान्य लोकांना आरोग्य सुविधा उपलब्ध न झाल्यास, अशा रुग्णांना पुढील उपचारासाठी रत्नागिरी, कोल्हापूर, मुंबई इत्यादी ठिकाणी आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी ते प्रयत्नशील असतात. अनेक संस्थांच्या माध्यमातून अशा गोर – गरीब लोकांना ते मदत करत असतात.
कोणत्याही मान – सन्मानाशिवाय ते सतत सामाजिक क्षेत्रात कार्यरत असतात. शाळा – महाविद्यालयातील गुणवंत विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप, आरोग्य साधने वाटप, गरजूंना आवश्यक साहित्याचे वाटप करणे ही कामे करत असतात. आरोग्य सेवेसह सामाजिक कार्यात ते अग्रेसर आहेत. विद्यार्थी गुणवत्ता विकास, महिला सक्षमीकरण आणि समाज विकासात ते सदैव विविध उपक्रमाचे आयोजन करता असतात. त्यांच्या याच कार्यावर प्रभावित होऊन रिजनल टीचर्स ऑर्गनायझेशन दापोली आणि पर्यटन व्यावसायिक महासंघ कोकण विभाग यांच्या वतीने पुरस्कार प्रदान केला आहे.
त्यांना यापूर्वी राज्यस्तरीय आरोग्य सेवारत्न नागरी पुरस्कार २०२५, कोविड योद्धासह अन्य सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील पुरस्कार प्राप्त झाले आहेत. तसेच ते विविध संघटनांच्या पदांवर कार्यरत असून त्या माध्यमातून सामाजिक कार्य करण्यासाठी सतत प्रयत्नशील आहेत. त्यामुळेच त्यांच्या पुरस्कार वितरण प्रसंगी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आणि संजय शितप यांचे मार्गदर्शक यशवंत निंबरे, कोकण मराठी साहित्य परिषदेच्या दक्षिण कोकण युवाशक्तीप्रमुख अरुण मोर्ये, प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते नंदकुमार बेंद्रे, चंद्रकांत वीर, सुभाष महाकाळ, मुख्याध्यापक सदानंद डिंगणकर, पदवीधर शिक्षक अरविंद महाकाळ, यांच्यासह त्यांचे कुटुंबीय सौ. सलोनी शितप, हर्ष शितप, रोहीतआणि मित्रपरिवार मोठ्या प्रमाणात उपस्थित होता.
हा पुरस्कार म्हणजे विविध क्षेत्रात करत असलेल्या आपल्या कार्याची पावती असून, यामुळे यापुढेही समाजासाठी अधिक जोमाने आणि व्यापक स्वरूपात कार्य करण्याची प्रेरणा मिळाली असून, भविष्यात असेच कार्य करत राहणार असल्याचे संजय शितप यांनी यावेळी सांगितले.
एका निःस्वार्थी आणि प्रामाणिक सामाजिक कार्यकर्त्याला रत्नागिरी जिल्हास्तरीय आदर्श विद्यारत्न पुरस्कार २०२६ प्रदान केल्याबद्दल सर्व स्तरातून रिजनल टीचर्स ऑर्गनायझेशन व पर्यटन व्यावसायिक महासंघ कोकण विभाग यांना धन्यवाद दिले जात असून, संजय शितप यांचे सर्वच स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे.