दापोलीच्या हर्णे-पाळंदे समुद्रकिनारी ‘सीगल’ पक्ष्यांचे पहिले दर्शन
दापोली: हिवाळ्याची चाहूल लागताच कोकण किनारपट्टीवर दरवर्षी दाखल होणाऱ्या परदेशी स्थलांतरित पाहुण्यांचे आगमन यंदाही वेळेवर सुरू झाले असून, दापोली तालुक्यातील प्रसिद्ध हर्णे-पाळंदे समुद्रकिनाऱ्यावर १ ऑक्टोबर २०२६ रोजी ‘सीगल’ पक्ष्यांचे यंदाच्या मोसमातील पहिले दर्शन घडले आहे. हजारो मैलांचा प्रवास करून उत्तर युरोप आणि सायबेरियासारख्या अतिथंड प्रदेशातून अन्नाच्या शोधात व अनुकूल हवामानासाठी भारतात येणाऱ्या या हिवाळी पाहुण्यांच्या आगमनाने दापोलीची विस्तीर्ण किनारपट्टी आता पुन्हा एकदा निसर्गसौंदर्याने बहरू लागली आहे.
समुद्री जीव व अधिवास संवर्धन संशोधक फहाद जमादार हे किनारपट्टीवर नियमित गस्त घालत असताना आणि समुद्री जैवविविधतेचे निरीक्षण करत असताना त्यांना हर्णे-पाळंदे किनाऱ्यावर हे सीगल पक्षी मुक्त संचार करताना आढळून आले. त्यांनी या हंगामातील पहिल्या आगमनाची शास्त्रीय नोंद अधिकृतपणे केली असून, यामुळे यंदाच्या स्थलांतरित पक्षी हंगामाची प्रत्यक्ष सुरुवात झाल्याचे स्पष्ट झाले आहे. दापोलीतील दाभोळ, कोळथरे, बुरोंडी, लाडघर, कर्दे, मुरुड, सालदुरे, पाळंदे, हर्णे, आंजर्ले, आडे, पाडले आणि केळशी या समुद्रकिनाऱ्यांवर दरवर्षी हे पक्षी मोठ्या संख्येने डेरेदाखल होत असतात.
हर्णे-पाळंदे परिसरातील समुद्रकिनारा हा स्थानिक व स्थलांतरित पक्ष्यांसह समृद्ध सागरी जीवसृष्टीसाठी अत्यंत महत्त्वाचा अधिवास मानला जातो. हिवाळ्यात येथे दाखल होणारे हे पक्षी केवळ पर्यटकांचे आकर्षण ठरत नाहीत, तर ते सागरी परिसंस्थेचा अविभाज्य घटक असून त्यांच्या उपस्थितीवरून किनारपट्टीच्या आरोग्यदायी वातावरणाचा अंदाज लावला जातो. अशा स्थलांतरित पक्ष्यांचे नियमित निरीक्षण, नोंदणी, छायाचित्रण आणि त्यांच्या अधिवासाचे संवर्धन भविष्यातील अभ्यासासाठी मोलाचे ठरणार आहे. सीगलच्या आगमनानंतर आता आगामी काळात आणखी कोणकोणते दुर्मीळ परदेशी पक्षी या किनारपट्टीवर दाखल होतात, याकडे समस्त पक्षीप्रेमी आणि सागरी जैवविविधता अभ्यासकांचे लक्ष लागले आहे.